Advertisements
Advertisements
Question
पुढील विषयावर निबंधलेखन करा:

Advertisements
Solution
माझा आवडता प्राणी
मला मनीमाऊ खूप आवडतात. मी सातवीत असताना "पिकू" आमच्या घरात एखाद्या पाहुण्यासमान आली. झालं असं, की बाहेर खूप पाऊस पडत होता आणि भर पावसात एक छोटंसं मांजराचं पिल्लू आमच्या दाराशेजारच्या अडचणीच्या जागेत कुडकुडत बसलं होतं. माझं सहज लक्ष गेलं आणि मी आई-बाबांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. मग आम्ही त्याला घरात घेतलं. त्याची काळजी घेतली. त्या दोन दिवसांत मला त्याचा खूप लळा लागला होता, म्हणून मी आई-बाबांकडे हट्ट धरून त्याला कायम घरीच ठेवून घेतले. तेव्हापासून 'पिकू' ही आमच्यासाठी 'वाघाची मावशी' अशी न राहता घरातली हक्काची सदस्य बनली आहे.
तिचा पांढराशुभ्र रंग, मऊ-मऊ अंग, गुलाबीसर ओठ, मिचमिच्या मिशा, जरा खुट्ट झालं, की हलणारे इवले-इवले कान मला खूप आवडतात. ती कधीही घरातली दुधाची भांडी पाडत नाही. घरातल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. तिला दूध पिताना पाहणं म्हणजे आनंदाचा क्षण असतो. कागदावर चित्र काढावंसं वाटतं, छायाचित्रात तिला कैद करावंसं वाटतं.
सुरुवातीला कापसाची गादी अंथरलेली टोपली हेच तिचं घर होतं; पण नंतर आमचं अख्खं घर हेच तिचं हक्काचं घर झालं. आता दिवसभर एखाद्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे ती बिनधास्त घरभर वावरते. रात्री माझ्या पलंगावर येऊन निजते. आपल्या घरात येणारे उंदीरमामा तिला घाबरूनच जीव मुठीत घेऊन पळतात. आमच्या व आजूबाजूंच्या घरातल्या उंदीरमामांचा फडशा पाडणे हे तिचं आवडतं काम!
ती आल्यापासून घरातलं वातावरण बदललं. तिच्या येण्याने घरात नव्या सदस्याचं आगमन झालं. घरात उत्साह आला, चैतन्य आलं. तिच्या छोट्या छोट्या कृतींनी तिने आमचं मन जिंकलं. ती सर्वांसोबत खेळते, मस्ती करते. खूप माया लावली आहे तिनं. तिचा प्रसन्न चेहरा पाहिला, की थकवा, कंटाळा, ताणतणाव दूर होऊन जातो. घरात कोणी आजारी पडलं, की ही पिकूताई त्याच्याशेजारी जाऊन बसेल, म्याँव म्याँव करून विचारपूस करेल, पंज्यानं थोपटत बसेल. अशी जीव लावणारी पिकू मला खूप आवडते.
प्राणी हे प्रेमाचे, मायेचे भुकेले असतात. ते मुके असले तरी प्रेमाची भाषा त्यांना कळते. त्यांना आपलंसं केलं, की ते आपल्याला आपलंसं करतात. घराला 'घरपण' देतात, 'पिकू' यांमुळेच माझी अत्यंत लाडकी मनीमाऊ आहे.
