Advertisements
Advertisements
Question
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) लेखकाच्या मते व्यंगचित्राच्या भाषेची वैशिष्ट्ये - (२)
(य) ..........
(र) ..........
(२) फरक लिहा: (२)
(य) आईचं नातं ..........
(र) बाकीची नाती ..........
|
व्यंगचित्रं ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते.’ हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’ विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
‘व्यंगचित्रांचे प्रभावीपण’ तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
Advertisements
Solution
(१) लेखकाच्या मते व्यंगचित्राच्या भाषेची वैशिष्ट्ये -
(य) नि:शब्द भाषा
(र) प्रभावी भाषा
(२)
(य) आईचं नातं जगातलं एकमेव खरं व सुंदर नातं.
(र) बाकीची नाती ही जोडलेली असतात.
(३)
लेखकाने आई आणि तिच्या प्रेमळ हृदयाचे अत्यंत भावस्पर्शी चित्र उभे केले आहे. त्या चित्रात वैशाख महिन्यातील धगधगता वणवा दाखवलेला आहे. त्या आगीच्या पार्श्वभूमीवर एक कोरडे, पानांविना झाड दिसते. त्या निर्जीव वाटणाऱ्या झाडावर एका पक्ष्याने आपले घरटे बांधलेले आहे. त्या घरट्यात तीन-चार पिल्ले चोच उघडून आकाशाकडे हताशपणे पाहताना दिसतात. चित्राच्या वरच्या भागात लांबवर ठिपक्यासारखी दिसणारी पक्षीण चोचीत पाण्याने भरलेला ढग धरून, जीव तोडून घरट्याकडे ओढत आहे. या एका दृश्यातून आपल्या पिल्लांचे प्राण वाचवण्यासाठी तिची चाललेली आर्त धडपड प्रभावीपणे व्यक्त होते.
या चित्रातून आईच्या अमर्याद मायेचे दर्शन घडते. अशी माया शब्दांत पूर्णपणे व्यक्त करणे कठीण आहे; कारण प्रत्येक आईला आपले बाळ हे स्वतःच्याच अस्तित्वाचा एक भाग वाटत असते. तिच्या आयुष्यातील सगळे पावित्र्य आणि शुद्धता या नात्यात एकवटलेली असते. बाळाला भूक लागण्याआधी ती आईला जाणवते. बाळाला थोडीशी जखम झाली तरी तिची वेदना आधी आईच्या मनात उमटते. बाळाच्या वाढीवर, आरोग्यावर आणि प्रत्येक हालचालीवर आईचे बारकाईने लक्ष असते. त्याच्या प्रगतीबाबत ती अत्यंत संवेदनशील असते.
आईचे प्रेम निःस्वार्थ आणि निर्मळ असते, कारण ती आपल्या बाळासाठी सर्व काही करते; पण त्याबदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. म्हणूनच जगातील सर्व समाजांमध्ये आई-मुलाचे नाते सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. या सर्व भावना आणि जाणीवा त्या एका चित्रातून प्रभावीपणे व्यक्त होतात. ते चित्र पाहताच ‘आई’ म्हणजे काय, हे सहजपणे समजून येते.
किंवा
भाषा आणि व्यंगचित्र ही दोन वेगवेगळी माध्यमे आहेत. त्यांची मांडणी वेगळी असते आणि त्यांचा परिणामही भिन्न असतो. अनेकदा चित्र किंवा व्यंगचित्र हे भाषेपेक्षा अधिक प्रभावी ठरते. चित्र शब्दांविना संवाद साधते. उदाहरणार्थ, घराचे चित्र दाखवले तर जगातील कोणत्याही व्यक्तीला ते काय दर्शवते हे सहज समजते. तेथे भाषा, देशांच्या सीमा किंवा सामाजिक-सांस्कृतिक भेद अडथळा ठरत नाहीत. चित्रातून आशय थेट आणि पटकन समजतो. त्यामुळे चित्र हे भाषेपेक्षा संदेश अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचवते.
चित्र आणि व्यंगचित्र यांत मात्र फरक आहे. साधे चित्र एखादी वस्तू किंवा दृश्य दाखवते; परंतु व्यंगचित्र त्या वस्तूशी संबंधित माणसांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भाष्य करते. उदाहरणार्थ, घराचे चित्र फक्त घर दाखवेल; पण घराचे व्यंगचित्र त्या घरातील लोकांच्या वृत्ती आणि त्यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकेल. त्यामुळे व्यंगचित्र अधिक प्रभावी ठरते.
व्यंगचित्रकार केवळ विषयाचे वर्णन करत नाही. त्याला माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीवर टिप्पणी करायची असते. त्या स्पष्टपणे जाणवाव्यात म्हणून तो चेहऱ्यावरील हावभाव, हालचाली किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण रेषा मुद्दाम ठळक करतो. त्यामुळे साधे चित्र व्यंगचित्रात रूपांतरित होते. व्यंगचित्रातून केलेली टीका सहजपणे लक्षात येते आणि त्याचा आशय स्पष्ट होतो.
व्यंगचित्र बहुधा चालू घडामोडींवर भाष्य करत असते. प्रेक्षक त्या घटनांचा साक्षीदार असल्यामुळे त्याला व्यंगचित्रातील संदेश लगेच समजतो.
