Advertisements
Advertisements
Question
अपूर्ण कथा पूर्ण करा:
आज राहुल अतिशय आनंदात होता; कारण त्यांच्या शाळेची सहल पालगड येथे जाणार होती. लवकरच तो शाळेत पोहोचला त्याचे सर्वच मित्र तयारीनिशी आले होते. सहल सुरू झाली. गाडीत सर्वांची मस्ती चाललेली होती. घाटातून गाडी चालली होती. निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद सर्व मुले घेत होती. घाटात गाडी एका वळणावर थांबली आणि ..........
Advertisements
Solution
राहूलचे धैर्य
घाटात गाडी एका वळणावर थांबली आणि सारेच जण चिंतेत पडले, 'अशी अचानक गाडी का थांबली असेल!' प्रत्येकजण आपला तर्क लढवू लागला. नंतर सर्वांनाच कळले की, त्यांच्या गाडीच्या पुढच्या गाडीला भयंकर अपघात झाला होता. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या एका ट्रकने त्या गाडीला ठोकले होते. खाजगी सुमो गाडीतून गुप्ते कुटुंब पर्यटनाला चालले होते. वाहनचालकासह ते सर्व जण जखमी झाले होते. सर्वजण असह्य वेदनेने कण्हत होते.
एकाच जागी गाडी बराच वेळ उभी असल्याने राहूल, त्याचे वर्गमित्र-मैत्रिणी सारेच कंटाळले होते. उन्हाळ्याचे दिवस व भरदुपारची वेळ. रावराणे सरांनी चौकशी केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सर्व विदयार्थ्यांना गाडीतून खाली उतरविले व सर्वांची जवळच्या अंबामाता मंदिरात बसण्याची सोय केली. त्यांच्याबरोबर सावंत मॅडमना रहायला व त्यांचे मनोरंजक कार्यक्रम घ्यायला सांगितले.
वाहनचालकाने शाळेची गाडी रस्त्याच्या कडेला, एका बाजूला लावली. रावराणे सरांबरोबर राहूल व त्याचे काही मित्र होते. सर त्यांना म्हणाले, "मुलांनो, तुम्ही समाजसेवा शिकता ना? आज तुमच्या समाजसेवेची प्रात्यक्षिक परीक्षाच आहे असे समजा. आपल्याला आज दुर्घटनाग्रस्त माणसांना मदत करायची आहे. आपण ती कशी करणार? जरा विचार करा." सर्वजण विचार करू लागले. जखमींना काहीतरी प्राथमिक उपचार तरी व्हायला हवेत ना? एरवी बुद्धीने हुशार असूनही राहूल अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. आज तो अंत:स्फूर्तीने पुढे झाला. सरांच्या बरोबर राहूल व त्याचे मित्र जवळच्या गावात गेले. तेथे लहानसा दवाखाना होता, पण तेथे पुरेशी व्यवस्था नव्हती. मुख्य म्हणजे तेथे त्यादिवशी डॉक्टरच आले नव्हते. एव्हाना स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
महामार्गापलिकडे एक मोठे हॉस्पिटल आहे असे पोलिसांकडून कळले. पण रुग्णवाहिका नव्हत्या. जास्त वेळ काढण्यात अर्थच नव्हता. राहूलच्या लक्षात आले की, आपली शाळेची बस तर आहेच. तो पुढे सरसावला. त्याने सरांना सुचविले की, शाळेच्याच बसमधून जखमींना हॉस्पिटलमध्ये नेऊया. तेवढे ते बसमध्ये बसू शकत होते व त्यांची गाडी अगदी नादुरुस्त झाली होती. सरांना त्याचे म्हणणे पटले. सर्वांनी मिळून जखमींना गाडीत बसविले व ते सर्वजण निघाले. हॉस्पिटलच्या आवारात शाळेची बस बघून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. प्रसंगावधान राखून राहूल ओरडला, “लवकर या. रुग्णांना लवकर उपचार झाले पाहिजेत."
सरांनी डॉक्टरांचे आभार मानले. रुग्णांच्या नातेवाईकांनी सर्वकाही कळविले. ते घटनास्थळी येताच सर, राहूल व त्याचे मित्र तेथून निघाले. त्यानंतर ते अंबामाता मंदिरात गेले. सर्वांनी आपापले डबे उघडून नाश्ता केला व आता ते सर्वजण बसमधून पालगड किल्ला बघायला गेले.
