Advertisements
Advertisements
Question
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
|
मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तररात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम, की कुणाला चाहूलदेखील लागू नये; पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठं तरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे, असं वाटत राहतं. मी हलकेच उठतो. चूळ भरतो. डायनिंग टेबलजवळ येतो. त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. बाहेर पाहतो तो आसमंतात काळाकुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचादेखील डोळा लागलेला. त्यांच्यावरची पाखरंदेखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे तीन- साडेतीन तर वाजलेले असतात. का कुणास ठाऊक, ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखरझोपेत असतं. साऱ्या चिंता-काळज्या मिटल्या-विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं, आपलं खरंखुरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचंदेखील. तांबडसर बोगनवेलीचंदेखील. केशरी गुलमोहोराचंदेखील. जांभुळसर जॅक्रांडाचंदेखील. किरमिजी-निळसर-पिवळसर इवलाल्या इंद्रधनुष्यी फुलांच्या घाणेरीचंदेखील. पांढऱ्याशुभ्र नि रक्तचंदनी चाफ्याचंदेखील. |
- (आकलन) (२)
कारणे शोधा व लिहा:
(य) पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो.
कारण -
(र) पहाटेची वेळ मला फार आवडते.
कारण - - (आकलन) (२)
उताऱ्यात आलेल्या दोन फुलझाडांची नावे लिहा.
(य) --------------
(र) --------------- - (स्वमत/अभिव्यक्ती) (४)
'पहाटेचे आणि पाखरांचे असलेले जवळकीचे नाते,' तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
Solution
- (य) कारण - नुकते कुठे पहाटेचे तीन-साडेतीन वाजलेले असतात.
(र) कारण - सारे जग साखरझोपेत असते. - (य) बोगनवेल
(र) जॅक्रांडा - ‘रेशीमबंध’ या लेखामध्ये डॉ. यू. म. पठाण यांनी उत्तररात्र, पहाट आणि सकाळ या वेगवेगळ्या प्रहरांचे अत्यंत सुरेख आणि भावस्पर्शी वर्णन केले आहे. हळूहळू जागा होणारा परिसर, त्यामधील झाडे, वेलींवरील फुले आणि त्यांच्या भोवती फडफडणारी पाखरे यांचे निसर्गसौंदर्य त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी शब्दांत उभे केले आहे. विशेषतः पहाटेच्या वेळेस आणि पाखरांमधील नात्याचे त्यांनी केलेले वर्णन मनाला भिडणारे आहे.
पहाटेचा प्रसंग अगदी शांततेने सुरू होतो. त्या वेळी पाखरांचा हलका, कुजबुजणारा आवाज कानावर येतो आणि त्यांच्या हालचालींना सुरुवात होते. पहाट हळूहळू पसरू लागते. या शांत, निसर्गमय क्षणात लेखकाला मानवी भावनांचे प्रतिबिंब दिसते. पाखरांची कुजबुज म्हणजे जणू एकमेकांना विचारणा – “पहाट आली का?” याच वेळी लेखक कल्पना करतो की, पाखरांना त्रास होऊ नये म्हणून पहाट सुद्धा हळुवारपणे त्यांच्याकडे विचारते, “मी येऊ का?”
हे पहाट आणि पाखरांमधले कोमल नाते, त्यातील गोड संवाद, लेखकाने अत्यंत हळुवारपणे उलगडले आहे. त्यामुळे पहाटेचे आणि पाखरांचे विश्व एका आत्मीय आणि भावुक दृष्टीकोनातून सुंदरपणे रेखाटले गेले आहे.
किंवा
माझ्या लहानपणापासूनचे सर्व काही आठवते. जेव्हा सहलीला किंवा निसर्गात जायची संधी मिळते, तेव्हा खूप आनंद होतो. नदीत पोहायला मिळाले, तर तासनतास डुंबत राहावेसे वाटते. त्याचप्रमाणे, रानावनात भटकताना देखील मन प्रसन्न होते. झाडांभोवती वावरताना कंटाळा येत नाही. डोंगरावर पसरलेली हिरवीगार झाडांची दाटी पाहताना मन सुखावून जाते.
वनस्पतीही सजीव आहेत आणि त्यांनाही भावना असतात. माणसांप्रमाणे त्यांनाही आनंद आणि दुःख जाणवत असते. जर एखाद्या झाडावर प्रेमाने हात फिरवला, तर ते देखील सुखावते. प्रत्येक ऋतूसोबत माणसाचे एक भावनिक नाते जुळलेले असते. म्हणूनच, जेव्हा झाडे सुकत जातात, तेव्हा माणसाचे मन हळवे होते. झाडांची तोड सुरू झाली की मनाला खंत वाटते. म्हणूनच माणसे कुंड्यांमध्ये रोपे लावून त्यांची निगा राखतात आणि त्यातून आनंद घेतात.
हे सर्व घडते कारण माणूस आणि निसर्ग यांच्यात एक अतूट आणि खोल भावनिक नाते जुळलेले असते.
