Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शिक्षक झालो, तर...
Advertisements
उत्तर
आम्ही सगळे वर्गात धावतच शिरलो. दमलो होतो. घामाघूम झालो होतो. वर्गात वडकेबाई येण्याची वाट पाहत बसलो. वडकेबाई भूगोल शिकवतात. भूगोल शिकवताना राजस्थान असो की केरळ असो, वर्गात बसूनच त्या प्रदेशाच्या सफरीला जाऊन येतो. त्यामुळे भूगोल हा विषय शिकताना मजा येते. मला अनेक विषयांसाठी असे उत्तम शिक्षक लाभले. त्यामुळे मलाही वाटते मी शिक्षक व्हावे...
मला माहीत आहे, विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी खूप आदर असतो. हा आदर त्यांच्या मनात कायम राहावा, यासाठी वर्गात आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करीन. मुलांच्या मनात छोटे छोटे ताणतणाव असतात. त्यांना मोकळेपणाने बोलते करून तणावमुक्त करणे हे माझे सर्वांत महत्त्वाचे काम असेल.
मला आठवते, मी प्राथमिक शाळेत असताना मला गणिताच्या तासाला खूप ताण यायचा. हातचे घेताना घोटाळा व्हायचा. गणित चुकायचे. तीनअंकी, चारअंकी संख्यांचा गुणाकार करताना तर माझी दमछाक व्हायची. मी शिक्षक झालो, तर मला आल्या त्या अडचणी मी मुलांना येऊ देणार नाही. अडथळ्यांच्या नेमक्या जागा शोधून त्या दूर करीन. 'गणितस्य कथा: रम्य:' त्यांना सांगीन. कवितांचे रसग्रहण कसे करायचे, हे बारकाईने सांगीन. निबंध लिहायला शिकवीन. मुले आनंदाने शिकतील.
वर्गात कृतियुक्त अध्यापन पद्धतीचा वापर करीन. त्यामुळे विद्यार्थी आनंदाने शिकतील. शैक्षणिक उपक्रम, क्षेत्रभेट, सहल, करमणुकीचे कार्यक्रम यांमुळे विद्यार्थी मनाने खूप मोकळे होतात. आपला आत्मविश्वास वाढवतात. मी अशा कार्यक्रमांना नेहमी प्रोत्साहन देईन.
वार्षिक स्नेहसंमेलनांतून विदयार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव मिळतो. गायन, वादन, नृत्य, नाट्य, नकला अशा विविध कला ते उत्साहाने सादर करतात. क्रीडामहोत्सवातून विद्याथी विविध खेळांत प्रावीण्य संपादन करतात. त्यामुळे स्नेहसंमेलन व क्रीडामहोत्सव या दोन्ही कार्यक्रमांना माझा हार्दिक पाठिंबा असेल.
शिक्षक होणे हे माझे 'स्वप्न' आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन.
