Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा:
| ‘तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.’ |
Advertisements
उत्तर
आशयसौंदर्य: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित आणि वंचित जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष उभा केला. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना कवी ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेत त्यांच्या महान कार्याचा गौरव केला आहे. उपरोक्त ओळींमधून बाबासाहेबांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित होते.
काव्यसौंदर्य: चवदार तळ्याच्या संग्रामाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची महती गातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी वर्णव्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केले. नवविचारांची प्रेरणा देत त्यांनी नव्या इतिहासाची निर्मिती केली. अन्याय सहन करणाऱ्या जनतेचे ते महानायक ठरले. बहिष्कृत आणि पीडित समाजात त्यांनी नवचैतन्य निर्माण करून त्यांच्यात आत्मविश्वास जागवला.
भाषिक वैशिष्ट्ये: मुक्तशैलीत रचलेली ही कविता समर्पक आणि अर्थपूर्ण शब्दप्रयोगांमुळे प्रभावी ठरते. ‘मूक समाज’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या संकल्पनांचा योग्य वापर केल्यामुळे कवितेचा आशय अधिक ठळक होतो. ठाशीव आणि परिणामकारक शब्दकळा हे या कवितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. थेट शब्दप्रयोगांमुळे कवितेत ओज गुण प्रकटतो. आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुंदर मेळ साधल्यामुळे या ओळी रसिकांच्या मनाला आणि काळजाला स्पर्श करतात.
