Advertisements
Advertisements
प्रश्न
‘जनता विद्यालय, महाड’ या विद्यालयात नावीन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा.
Advertisements
उत्तर
पर्यावरण दिन - नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा
महाड, दि. ६ जून: महाड हे निसर्गसौंदर्याने नटलेले गाव आहे. मात्र अलीकडे शहरीकरण वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातील ‘जनता’ विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी ५ जून हा पर्यावरण दिन वेगळ्या आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एप्रिल महिन्यापासूनच विशेष तयारी सुरू केली.
उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोपांची लागवड करण्यात आली. गावातील तरुणांच्या सहकार्याने टेकड्या व मोकळ्या जमिनींवर वृक्षारोपण करण्यात आले आणि त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. महाड परिसरात अनेक पक्षी येत असल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे हौद स्वच्छ करण्यात आले तसेच त्यांच्यासाठी खाद्याची सोय केली. त्यामुळे काही दिवसांतच पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
याशिवाय गावातील मोठ्या तलावातील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले. लोकसहभागातून तलाव स्वच्छतेचे काम सुरू झाले. शाळेतील सर्व घटक या उपक्रमात सहभागी झाले. अशा प्रकारे पाणी शुद्धीकरण, वृक्षारोपण व संवर्धन आणि पक्षी संरक्षण हे तीन उपक्रम गावात यशस्वीपणे राबवले गेले. या कार्याची दखल तालुका पंचायत समितीने घेऊन जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. हे उपक्रम पुढेही सुरू राहावेत यासाठी ग्रामपंचायतीने योजना आखली, हेच या प्रयत्नांचे फलित ठरले.
