Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:
शीतयुद्धोत्तर काळातील खालील प्रादेशिक संघटना स्पष्ट करा.
- शांघाय सहकार्य संघटना (SCO)
- सार्क (SAARC)
- बीम्सटेक (BIMSTEC)
- ब्रिक्स (BRICS)
- जी-20 (G - 20)
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्त्वांवर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकांवर आधारलेल्या असू शकतात. काही महत्त्वाच्या प्रादेशिक संघटना खालीलप्रमाणे आहेत:
- शांघाय सहकार्य संघटना (SCO): शांघाय सहकार्य संघटना राजकीय, आर्थिक व सुरक्षाविषयक संघटना आहे. या संघटनेची स्थापना २००१ मध्ये शांघाय येथे झाली. चीन, रशिया, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी एकत्र येऊन SCO संघटनेचे गठन केले. पुढे २०१६ साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. गेल्या काही वर्षांत या संघटनेने दहशतवादाविरुद्ध सहकार्यावर भर दिला आहे. राजकीय संवाद/चर्चा व आर्थिक सहकार्य यांद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते.
- सार्क (SAARC): १९८५ मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव असे सात देश सदस्य होते. २००७ मध्ये अफगाणिस्तानचा आठवा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय संघ यांच्यासह ९ देश व संघटनांना सार्कमध्ये ‘निरीक्षक दर्जा’ बहाल करण्यात आला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे सार्कचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार (SAPTA) १९९३ साली अस्तित्वात आला. पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र (SAFTA) ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था २००६ मध्ये एका करारामुळे कार्यन्वित झाली ज्यामुळे १९९३ ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली.
- बीम्सटेक (BIMSTEC): ‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ म्हणजेच बीमस्टेकची स्थापना १९९७ मध्ये झाली. बीमस्टेक मध्ये बंगालच्या उपसागरालागतच्या व इतर जवळच्या भागांमधील एकूण सात सदस्य देश सामील आहेत. त्यात दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका, असे पाच देश तर दक्षिण पूर्व आशियातील दोन देश, म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश आहे. बीम्सस्टेक दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या दोन प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्यांच्या विषयांवर सहकार्य घडवून आणणे हे बीम्सटेकचे प्रमुख कार्य आहे.
- ब्रिक्स (BRICS): ब्रिक्स ही संघटना २००९ साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. २०१० मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे जी-२० चे सदस्य आहेत.
- जी-20 (G-20): युरोपियन संघ आणि १९ इतर राष्ट्रांची सरकारे व मध्यवर्ती बँकांचे गर्व्हनर यांच्यासाठी १९९९ मध्ये जी-२० नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. त्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबतच्या धोरणांची चर्चा करणे हा होय. २००८ पासून जी-२० शिखर परिषदांमध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यांसारखी विकसित राष्ट्रे जी-२० चे सभासद आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. जी-२० मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
