हिंदी

प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राथमिक आर्थिक क्रियांचे प्रकार स्पष्ट करा. 

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. शिकार: अन्नासाठी शिकार करणे हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शिकारीमुळे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्‍या आहेत व काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्‍यामुळे जगभर व्यावसायिक शिकारीवर बंदी आहे. तसेच प्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन कायदे करण्यात आले आहेत. सद्य:स्‍थितीत काही आदिवासी जमाती त्‍यांच्या चरितार्थापुरती शिकार करतात. दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटातील बुशमेन, विषुववृत्‍तीय सेल्‍व्हाज घनदाट जंगलातील पिग्‍मी, बोरा इंडियन, टुंड्रा प्रदेशातील एस्‍किमो, अंदमान निकोबारमधील सेंटीनल, जरावा, ओंग इत्‍यादी आदिम जमाती शिकार करून आपला चरितार्थ चालवतात.
  2. फळे-कंदमुळे गोळा करणे: हा व्यवसाय वनांवर आधारित असून जगातील अनेक लोक हा व्यवसाय करतात. वनातील फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्‍पती गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवितात. याशिवाय झाडापासून मिळणारा डिंक, राळ, लाख, मध, मेण इत्‍यादींसारखे पदार्थही गोळा करतात. उदा. खैरापासून कात मिळवला जातो. या काही पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्‍याने त्‍यांचे व्यापारी तत्‍त्‍वावर देखील संकलन होते. जगातील सर्व वनप्रदेशांमध्ये फळे-कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय चालतो. विषुववृत्‍तीय प्रदेशांतील जंगले अत्‍यंत दाट व सदाहरित असतात. तेथील हवामान दमट, रोगट असते. सरपटणारे प्राणी व कीटक यांचाही उपद्रव तेथे होत असतो. म्‍हणून या प्रदेशांत विविध वस्‍तू गोळा करण्याचा व्यवसाय व्यापारी तत्त्‍वावर करता येत नाही.
  3. लाकूडतोड: वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूडतोड हा एक महत्‍त्‍वाचा व्यवसाय आहे. वनस्‍पतींच्या बदलत्‍या स्‍वरूपानुसार आपण पृथ्‍वीवरील वनप्रदेशांचे वर्गीकरण विविध नैसर्गिक प्रदेशांत करतो. उष्‍ण कटिबंधीय सदाहरित वनांतील वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते. शिवाय ही वने इतकी घनदाट असतात की, तेथे व्यापारी तत्‍त्‍वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही. उष्‍ण कटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामान प्रदेशातील वने विरळ असतात. तळाशी अनेक झाडेझुडपे उगवतात. ही वने दाट वस्‍तीच्या प्रदेशांच्या सान्निध्यात असल्‍याने या वनातील जमिनी मोठ्या प्रमाणात शेतीखाली आणल्‍या आहेत. त्‍यामुळे वने नष्‍ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्‍तृत प्रदेशात उगवलेले असतात. हे वृक्ष सरळ उंच वाढतात. ती सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष मऊ लाकडामुळे लाकूडतोड व्यवसायासाठी उपयुक्‍त आहे. जगात सर्वांत जास्‍त व्यापारी तत्त्‍वावर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनांत केला जातो. वर लाकूडतोड व्यवसाय सूचीपर्णी वनांत केला जातो. आज जगात लाकूड विविध कारणांसाठी अतिशय उपयुक्‍त असल्‍यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूडतोड केली जात आहे. त्‍यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम म्‍हणून पर्यावरणासंबंधीच्या अनेक गंभीर समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत.
  4. मासेमारी: मासेमारी या प्राथमिक व्यवसायावर अनेक प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम होतो. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते मर्यादित असले तरी, सद्य:स्थितीत ही एक महत्त्वाची प्राथमिक क्रिया आहे. विशेषत: किनारपट्टीच्या प्रदेशांत या व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
    1. मासेमारी व्यवसायास अनुकूल असणारे घटक:
      1. समुद्राचा असा भाग जो २०० मी. पेक्षा कमी खोल आहे अशा उथळ समुद्रास भूखंड मंच म्हणतात. उदा., वायव्य पॅसिफिक महासागरातील चीनजवळील ओखोत्स्क.
      2. उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संगम विशेषत: भूखंड मंचावर होत असल्यास अशा प्रदेशांत प्लवंकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेया भागात मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. असे प्रदेश निसर्गत: मासेमारीची क्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस येतात. उदा. क्युरोशियो उष्णप्रवाह व ओयाशियो थंड प्रवाह जपानजवळ एकत्र येतात. या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
    2. मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे इतर घटक:
      1. जपान आणि चीनसारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे, त्यामुळे तेथे हा व्यवसाय जास्त वृद्‌धिंगत झाला आहे.
      2. जमिनीची कमतरता, जास्त लोकसंख्या आणि प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्नघटकांची टंचाई यांमुळे बेट स्वरूपातील देशांना मासेमारीवर अवलंबून राहावे लागते. उदा. जपान, फिलिपाइन्स. त्यामुळे येथे हा व्यवसाय परंपरेने आर्थिक व्यवसाय म्हणून विकसित झाला.
      3. इतर व्यवसायांची कमतरताही या व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत आहे.
      4. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा व्यवसाय वाढीस लागला.
      5. दंतूर किनारे उत्तम बंदरांच्या निर्मितीस साहाय्यक ठरतात.
      6. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये मासे हा नाशवंत पदार्थ सहज साठवता येतो. उष्ण कटिबंधात मात्र त्यासाठी शीतगृहांची सोय करावी लागते.
      7. किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्याने जहाजबांधणी व्यवसायासाठी लाकूड सहज प्राप्त होते.
  5. पशुपालन: पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण ३०° ते ६०° उत्‍तर व ३०° ते ५५° दक्षिण अक्षवृत्‍तादरम्‍यान झालेले दिसते. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. उत्‍तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्‍त झालेला आढळतो. ऑस्‍ट्रेलिया आणि दक्षिण व उत्‍तर अमेरिका खंडांतील पशुपालन अत्‍याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि विस्‍तीर्ण गवताळ कुरणे यांनी प्रभावित झालेले आहे. दक्षिण अमेरिका व उत्‍तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून येथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्‍ट चारा असणाऱ्या विषुववृत्‍तीय प्रदेशांत या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही. 
  6. खाणकाम: मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आला आहे. हत्‍यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्‍यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्‍कृतिक उत्‍क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्‍याच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्‍य आत्‍मसात केले. अनुक्रमे कांस्‍ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग याप्रमाणे कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधाेरेखित करण्यात आले. या प्राथमिक आर्थिक क्रियेतूनच मानवाची उत्‍तरोत्‍तर प्रगती होत गेली आहे. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातूनसुद्धा खनिजतेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्‍पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्‍वीवर खनिजांचे वितरणही असमान आहे. त्‍यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्‍धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्‍धता असली तरीही प्रत्‍यक्षात खाणकाम व्यवसाय त्‍या प्रदेशाची भूगर्भरचना, खनिजांचे मूल्‍य, हवामान, भांडवल, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्‍यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. खाणक्षेत्राजवळ खनिजांशी संबंधित अनेक उद्योगधंदे स्‍थापित होतात. मोठ्या प्रमाणावरील खाणकाम व्यवसायासाठी विकसित वाहतूक व्यवस्‍था ही महत्‍त्‍वाची असते. खाणकाम व्यवसायात वाढ झाली की, उद्योगधंद्याचा विकास होतो. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासातही वाढ होते.
  7. शेती: जागतिक स्‍तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्‍या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्‍त आहे. त्‍या मानाने आशिया खंडात ते कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया या खंडांत शेतीक्षेत्र विस्‍तृत असूनदेखील या व्यवसायात गुंतलेल्‍या लोकसंख्येचे प्रमाण अत्‍यंत कमी आहे. अर्थात विकसित राष्‍ट्रांत शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्‍ट्रांत या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्‍त आहे. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्‍यामुळे जगात विविध प्रदेशांत विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्‍याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पाहावयास मिळतात. शेती या व्यवसायावर मृदा, हवामान, पाणीपुरवठा, इत्‍यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो; तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्‍क इत्‍यादी मानवी घटकांचा परिणाम होतो. या घटकांना अनुसरूनच पीकपद्धतीमध्ये बदल दिसून येतो. चित्राकृतींच्या साहाय्याने अनेक शेतीप्रकार व त्‍यांची वैशिष्‍ट्ये याची आपण माहिती घेतली. काही ठिकाणी शेतीमध्ये ग्रीन हाउस, पॉली हाउस मधूनही आधुनिक पद्धतीने उत्‍पादने घेतली जातात. त्‍याचबरोबर संकरित बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा वापर करून उत्‍पादनवाढीचे प्रयत्‍न केले जातात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×