‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution
'योगी सर्वकाळ सुखदाता' ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना करून योगीपुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणे देऊन संत एकनाथ पटवून देतात.
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकरता पाणी हेच जीवन असते. प्रत्येक गोष्टीकरता त्यांना पाण्याची गरज भासते; मात्र पाणी फक्त बाह्यांग स्वच्छ करू शकते, ते आपले अंतरंग स्वच्छ करू शकत नाही; परंतु योगीपुरुष मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ करतो. तहानलेल्या जीवाला पाणी प्यायल्यावर मिळणारे सुख हे तात्पुरते असते. ते सुख चिरकाल टिकत नाही. हा सुखाचा अनुभव पुन्हा तहान लागेपर्यंतच टिकतो. योगीपुरुष मात्र त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला कधीही न संपणाऱ्या स्वानंदाचा अनुभव देतो.
तहान भागवणाऱ्या पाण्याचा गोडवा जिभेलाच सुखावतो; परंतु आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करणारा योगीपुरुष आपल्या वाणीने, आपल्या उपदेशाने आपल्या इंद्रियांना संतुष्ट करतो. ढगातून पडणाऱ्या पावसामुळे शेतीभाती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याचप्रमाणे योगीपुरुषाच्या येण्याने सर्वसामान्यांना आत्मानुभूती होऊन त्यांचा उद्धार होतो. अशाप्रकारे, संतकवी एकनाथ योगीपुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात.