वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
Solution
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख
(२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख
(३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख
(४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख
(५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखाद्या क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते. या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्ती संबंध झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.