उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) वर्णन करा. (२)
डेथ झोन
'डेथ झोन' ची चढाई सुरू झाली... जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेल्या बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला... पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. 'तुला मरायचं नाहीये, अरुणिमा', अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. २१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. 'अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर... एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेरलापाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला... मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला... अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. |
२) अरुणिमाचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा अनुभव लिहा. (२)
अ) __________________
आ) __________________
इ) __________________
ई) __________________
३) स्वमत- (३)
'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Solution
१) डेथ झोन-
- जिकडे तिकडे मृतदेहांचा खच
- हाडं गोठवणारी थंडी
- मृत्यूचं जवळून दर्शन
- अरुणिमाला आदल्या रात्री भेटलेला बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला होता.
२)
अ) अरुणिमा एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली, हा क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची शेरपाला विनंती केली.
आ) फोटोसाठी शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क काढला.
इ) फोटोनंतर शेरपाला व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं.
ई) भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला.
३) अरुणिमा ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध होती. अचानकपणे अपघातातून आलेल्या अपंगत्वाने तिचे आयुष्यच बदलून गेले. अशा अवघड प्रसंगी खचून न जाता ती जिद्दीने पेटून उठली. असंख्य अडचणींना सामारे जात तिने आपले ध्येय साध्य केले. ती शरीराने अपंग झाली; मात्र मनाने कधीच नाही.
अशीच जिद्दी अरुणिमा प्रत्येकात लपलेली असते. ती बाहेर आणण्याकरता केवळ एका क्षणाची गरज असते. तो क्षण असतो, आपल्याला आपले ध्येय समजण्याचा. ते ध्येय एकदा समजले, की त्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्याची शक्ती आपोआपच निर्माण होते. त्या ध्येयवेडेपणातून ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक धैर्य, साहस, जिद्द, मेहनत या सार्यांची तयारी आपोआप होते. मानवाचे ध्येय जेव्हा निश्चित होते तेव्हा तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही त्याला दिसू लागतो. या गोष्टी आपल्यात दडलेल्या असतात. त्यांना केवळ बाहेर काढण्याची गरज असते.