उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तरे लिहा. (२)
- भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
- अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
(बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. |
२) एका शब्दात माहिती लिहा. (१)
i) अरुणिमाचा प्रवास
- प्रवासाचा दिवस-
- स्टेशन व रेल्वेगाडी-
ii) कारण लिहा. (१)
रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...
३) स्वमत- (३)
तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
Solution
१)
- भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला - सीआयएसएफची नोकरी मिळते का बघ म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील.
- अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली - हॉलीबॉल
२)
i) अरुणिमाचा प्रवास
- प्रवासाचा दिवस- ११ एप्रिल २०११
- स्टेशन व रेल्वेगाडी- लखनऊ स्टेशन, पद्मावती एक्सप्रेस.
ii) रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले कारण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे, असे त्यांना वाटत होते.
३) रेल्वेचा प्रवास म्हटला, की मौजमजा आणि गंमती घडतच असतात. असाच माणसाच्या स्वभावाचे दर्शन घडवणारा अनुभव मला एका प्रवासात आला. कोकण रेल्वे आणि गर्दी हे अगदी नेहमीचे समीकरण झाले आहे. आम्ही संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावी कोकणात रेल्वेने निघालो होतो. जो तो आपल्याला बसण्यासाठी जागा कशी मिळेल यासाठी धडपडत होता. पनवेल स्टेशनला गाडी थांबली आणि एक वयोवृद्ध जोडपे आमच्या डब्यात आले. आमच्या समोरच्या सिटवर थोडी जागा पाहून तेथे बसले. तेथे अगोदर बसलेल्या कुटुंबाला मात्र त्यांचे तेथे बसणे रुचलेले नव्हते. थोड्याशा धुसफुशीत प्रवास सुरू होता. अचानक गावाकडच्या गप्पांना सुरुवात झाली. सुरुवातीला नाराज असलेले ते लोक नंतर त्या आजोबांशी अशाप्रकारे गप्पा मारत होते, की जणू ते त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. माणसाच्या विचित्र स्वभावाची ओळख करून देणारा हा अनुभव होता.