उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका शब्दात उत्तरे लिहा. (२)
- अरुणिमाचा निर्धार -
- अरुणिमाचा पहिला टप्पा -
माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 'शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.' अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला 'शक्य आहे' असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स' मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब – आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ’अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!“ |
२)
1. कोण ते लिहा. (१)
एव्हरेस्ट सर करणारी महिला -
2. खालील कृतीतून व्यक्त होणारा गुण लिहा. (१)
माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले.
३) स्वमत- (३)
’आपल्या आतलं एव्हरेस्ट आपल्यालाच सर करायचे असते“ हे विधान सोदाहरण तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
Solution
१)
- अरुणिमाचा निर्धार- एव्हरेस्ट सर करणे
- अरुणिमाचा पहिला टप्पा- गिर्यारोहण प्रशिक्षणाचा
२)
1. एव्हरेस्ट सर करणारी महिला - बचेंद्री पाल
2. कुटुंबाचे प्रेम व पाठिंबा
३) एव्हरेस्ट सर करणे म्हणजे अतिशय अवघड गोष्ट पूर्ण करणे. प्रत्येकाला आयुष्यात अडचणी येत असतात. आपण निवडलेले मार्ग खडतर असतात किंवा ध्येय अशक्यप्राय वाटतात. काही गोष्टी आपण इतरांना दाखवत नाही; मात्र जगण्याचा संघर्ष आपल्या मनात सुरू असतो. असे म्हटले जाते, की कोणतीही लढाई जिंकणे किंवा हारणे हे मानसिक असते. मनाने खंबीर असलेली व्यक्ती केवळ आपल्या आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर अशक्यप्राय गोष्ट साध्य करू शकते. दोन्ही पाय निकामी झाल्यानंतरही एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहणारी आणि ते प्रत्यक्षात पूर्ण करणारी अरुणिमा याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. मनाने जिंकलेला म्हणजेच मनाचे एव्हरेस्ट सर केलेला नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. अपघातात हात गमावूनदेखील आपला चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी पायाने चित्र काढणारी व्यक्ती म्हणजे हे मनाचे एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती असते.