स्वमत.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
Solution
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.
दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.
दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल.