स्वमत.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
Solution
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.
प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.
माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत.
आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.