स्वमत.
‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत अाहात ते सकारण स्पष्ट करा.
Solution
भाषा आणि व्यंगचित्र ही दोन भिन्न माध्यमे आहेत. त्यांचे सादरीकरण भिन्न असते आणि त्यांचे परिणामही भिन्न असतात. आपण घर हा शब्द लिहितो, तेव्हा घर या शब्दाचा आकार पाहून किंवा घर या शब्दाच्या उच्चारातून जो ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी ऐकून घराचा बोध होऊ शकणार नाही. फक्त मराठी भाषा समजणाऱ्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. घर शब्दाच्या आकाराशी व उच्चाराशी घर ही वस्तू जोडलेली आहे. ज्याला हा संकेत माहीत आहे आणि ज्याने तो संकेत लक्षात ठेवला आहे, त्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. याउलट, घराचे चित्र दाखवल्यावर ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या वस्तूचा बोध होतो. तिथे भाषेची आडकाठी येत नाही. देशाच्या सीमा आड येत नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक दर्जाचा संबंध येत नाही. चित्रातून आशयाचे थेट आकलन होते. म्हणून भाषेपेक्षा चित्र आशयाला प्रेक्षकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते.
चित्र व व्यंगचित्र यांत काहीएक फरक आहे. व्यंगचित्रात काही व्यक्ती दाखवलेल्या असतात. व्यंगचित्रकार कधीही विषयवस्तूचे फक्त वर्णन करीत नाही. त्याला माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर काहीएक भाष्य करायचे आहे. त्या वृत्ती-प्रवृत्ती ठळकपणे लक्षात याव्यात म्हणून माणसांचे चेहेरे, त्यांवरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यांतील काही रेषा मुद्दाम ठळकपणे चितारतो. त्यामुळे चित्र हे व्यंगचित्र बनते. व्यंगचित्रातून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर केलेली टीका कोणालाही पटकन कळू शकते. तोच भाव समजावून सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात. खूप शब्द वापरूनही सर्व आशय नेमकेपणाने व्यक्त होतोच असे नाही. व्यंगचित्राच्या बाबतीत असे घडत नाही. तेथे आशय स्पष्टपणे लक्षात येतो.
व्यंगचित्रात चालू घडामोडींवर भाष्य असते. व्यंगचित्र पाहणारा प्रेक्षक चालू घडामोडींचा साक्षीदारही असतो. म्हणून त्याला व्यंगचित्र पटकन कळू शकते.