उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कृती पूर्ण करा. (०२)
यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी.
१. ______ २. ______
३. ______ ४. ______
साधारणत: कुत्रयापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽवऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. |
२. आकलन
चौकटी पूर्ण करा. (०२)
वाघिणीच्या पिल्लांचे खेळ
१ . ______ २.______
३. स्वमत (०३)
'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली' हे विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
Solution
१.
१. सांबर २. रानगवा
३. नीलगाय ४. रानडुक्कर
२. वाघिणीच्या पिल्लांचे खेळ
१. एकमेकांचा पाठलाग करणे
२. मारामारी करणे
३. लेखकाने उताऱ्यात वर्णन केल्याप्रमाणे वाघीण आपल्या लहानग्या पिल्लांची पावलोपावली काळजी घेताना दिसते. आपल्या मस्तीत रममाण मुलांना ती मध्येच थांबून मायेने चाटत होती. जणू त्यांचा खेळ पाहून त्यांची निरागसता तिच्यातील आईपणाच्या भावनेला उधाण आणत होती. पिल्लांचं पोट भरावं म्हणून तिने मोठ्या कष्टाने शिकार केली होती आणि त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी ती त्यांना शिकारीकडे घेऊन गेली. जंगलात जाताना आपली सगळी पिल्लं आपल्या सोबत असावीत याचीही तिनं काळजी घेतली होती. या सगळया घटनांवरून हे स्पष्ट होते, की वाघिणीला पिल्लांच्या सुरक्षेची खूप काळजी होती. ती कुठेही गेली तरी तिचं मन नेहमी पिल्लांकडे एकवटलेलं होतं, पिल्लांसाठी कितीही त्रास सोसण्याची तिची तयारी होती. पिल्लांना व्यवस्थित खाऊपिऊ घालण्याबाबत ती सावधान होती. एखादी प्रेमळ, दक्ष, कर्तव्यतत्पर आई, आपल्या बाळाचं जसं संगोपन करते, तसंच ती आपल्या पिल्लांचं संगोपन करत होती. त्यामुळेच, लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली.