खालील कथालेखन करा.
रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.
Solution
कल्पकता: यशाचे रहस्य |
रतन नावाचा एक तरुण होता. तो आपल्या कुटुंबासह माणगांव या गावात राहात होता. त्याचे वडिल पूर्वी गाडी दुरुस्त करण्याचे काम करत. वयोमानाप्रमाणे ते थकले होते. त्यांनी ते काम बंद केले होते. रतनला शेती करण्याची आवड होती; मात्र हालाखीची परिस्थिती असल्यामुळे त्याच्या मनाप्रमाणे आधुनिक शेती त्याला करता येत नव्हती. नवी यंत्रे विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल त्याच्याकडे नव्हते. रतन हा लहानपणापासूनच बुद्धिमान आणि धडपड्या वृत्तीचा होता. त्याची कल्पनाशक्ती अफाट होती. एकदा सहज विचार करत असताना त्याच्या डोक्यात काहीतरी चमकले. तो उठला व अडगळीच्या खोलीत गेला. तेथे त्याच्या वडिलांचे काही सामान पडलेले होते. त्या वस्तूंमधून त्याने काही वस्तू उचलल्या. त्याची जोडणी केली. दहा दिवस तो या वस्तूंची उलटसुलट जोडणी करत होता. प्रयत्न फसत होते; पण तो तितक्याच जोमाने पुन्हा सुरुवात करत होता. शेवटी आपल्या कल्पनाशक्तीचा मदतीने त्याने आपल्या शेतीसाठी एक उपयोगी यंत्र बनवले. रतनने बनवलेल्या यंत्राच्या मदतीने शेतीसाठी पाणी देणे सोपे झाले होते. पाणी खेचणाऱ्या पंपाला हे यंत्र बसवल्यानंतर एका ठरावीक काळानंतर पंप आपोआप बंद होत होता. त्यामुळे, शेतीला आवश्यक तेवढेच पाणी मिळू लागले. शिवाय, वीजबचत आणि पाणीबचतही होऊ लागली. त्याच्या या यंत्राची प्रसिद्धी पाहता पाहता सर्वत्र पसरली. रतनच्या या कल्पक शोधाबद्दल त्याला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त झाला. सारेच त्याचे कौतुक करत होते. आपल्याकडे असलेल्या कल्पकतेचा उपयोग केला, तर यश नक्कीच मिळते, हा धडा त्याने साऱ्या तरुणांसमोर घालून दिला. तात्पर्य: ज्ञानाच्या मदतीने अशक्य गोष्टी सुध्दा शक्य होतात. |