खालील कथालेखन करा.
रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.
Solution
जिद्द ही यशाची पहिली पायरी |
रोहिणी नावाची मुलगी एका छोट्याशा खेडेगावात राहत होती. तिच्यासोबत तिची आई आणि दोन बहिणी राहत होत्या. तिचे वडील काही वर्षांपूर्वी देवाघरी गेल्यामुळे घरामध्ये कमावणारे कोणीच नव्हते. नाही म्हणायला आई गावातील धुणीभांडी करी. वडिलांनंतर रोहिणीच्या घरी शेती करणारे कोणीही नसल्यामुळे शेती ओस पडली होती. सर्वसाधारण परिस्थितीत आपल्या बहिणींचा व आपला उदरनिर्वाह होणे कठीण आहे हे रोहिणीने ओळखले. रोहिणी मुळातच हुशार होती. तिने आपल्या आईला म्हटले, “आई, तू घरकाम करतेस त्यात आपले घर चालत नाही. त्यापेक्षा आपण आपली शेती केली तर?” रोहिणीच्या आईला तिचे म्हणणे पटले. रोहिणीने मनाशी खूणगाठ बांधली, मी तर शिकणारच; पण माझ्या दोन्ही बहिणींना मी शिकवणार. तिघी बहिणी जिद्दी होत्या. रोहिणी आपल्या बहिणींसह शेतात राबू लागली. मोकळया वेळात अभ्यास करत होती. आपल्या बहिणींचा अभ्यास घेत होती. तिचे स्वप्न मोठे होते. तिला पोलीस अधीक्षक बनायचे होते. तिची अभ्यासातील हुशारी आणि शेतात काम करून आलेली शारीरिक व मानसिक कणखरता यांमुळे तिने तिचे स्वप्न साकार केले. ती पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाली. स्वत:बरोबरच तिने आपल्या बहिणींना शिक्षणाची गोडी लावली. त्यांचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या दोन्ही बहिणी तिच्यासारख्याच मेहनती होत्या. त्यातील एक शिक्षिका, तर दुसरी सनदी अधिकारी म्हणून नियुक्त झाली. घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा कष्ट करण्याची व शिक्षणाची आवड असल्यामुळे रोहिणीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. तात्पर्य: इच्छा प्रबळ असेल, तर मार्ग सापडतोच. |