उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. म्हातारा भिक्षेकरी कोठे बसला होता?
२. भिक्षेकर्याने अंगावर व अंगाखाली काय पांघरले होते?
पुढे चार-पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यांनतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे! मी म्हटले, ’बाबा, तुम्ही मला ओळखले?“ त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, ’बाबा, पाच-सहा दिवसांपूर्वी मी तुम्हांला दोन शाली दिल्या होत्या. आठवते?“ यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, ’हे भल्या माणसा, तू लई मोठा! म्यास्नी शाली दिल्या! पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट! मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा! आमचं हे असलं बिकट जिणं! तुझं लई उपकार हायेत बाबा.“ शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब! भुकेल्यास अन्न दयावे, तहानलेल्यास पाणी दयावे आणि हेही जमले नाही, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी दयाव्यात! |
२. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
३. स्वमत कृती (०३)
'पांघरण्यासाठी दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याने विकल्या' त्याची ही कृती तुम्हांस योग्य वाटते, की अयोग्य हे सकारण लिहा.
Solution
१.
- म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वरा मंदिराच्या पुलाच्या जवळपास मध्यावर बसला होता.
- भिक्षेकऱ्याने अंगावर व अंगाखाली चिरगुटे पांघरली होती.
२. शाली विकल्यावर भिक्षेकऱ्याने व्यक्त केलेल्या भावना
- शाली देणारा लेखक भला माणूस आहे
- माझ्यासारख्या भिकार्याला शाली शोभत नाहीत
- शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट असते
- आमचं जिणं बिकट आहे
३. माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरज भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्त ठरणार होत्या; मात्र शरीराच्या उबेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली. त्यामुळे, मागचा-पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली. त्याला जाणवणारी भूक ही त्याला बोचणार्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यामुळे, त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते.