पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
Solution
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ६ जानेवारी २०२१ प्रति, श्री. विनोद कुमरे सर माननीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, कारंजा ता. कारंजा, जि. नागपूर ४०००१७ विषय: 'किशोरवयीन विद्यार्थ्यांकरता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्याची विनंती करण्याबाबत.' माननीय महोदय, मी कारंजा येथील विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. कालच वर्तमानपत्रातील आपल्या अभिनव उपक्रमाविषयीची जाहिरात वाचनात आली. महिला सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले, 'महिला सुरक्षा स्वतंत्र ॲप' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आजच्या घडीचा विचार करता महिलांना आणि किशोरवयीन मुलांना अनेक संकटांशी सामना करावा लागतो. अशावेळी स्वसंरक्षणासाठी त्यांनी सज्ज असणे आवश्यक ठरते. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच आमच्या शाळेने 'स्वसंरक्षण शिबीर' आयोजित केले आहे. या शिबिरात आपण किशोरवयीन विद्यार्थ्यांना सुरक्षाविषयक मार्गदर्शन करावे अशी मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विनंती करत आहे. कृपया, यासंबंधीचा आपला विचार आपण लवकरात लवकर कळवावा ही विनंती. कळावे, आपली कृपाभिलाषी, स्नेहल विकास विद्यालय, राजवीर नगर, ता. कारंजा, जि. नागपूर ४०००१७ |
किंवा
अभिनंदन पत्र – (औपचारिक)
दिनांक: ११ जानेवारी २०२१ प्रति, माननीय श्री. रमाकांत जाधव पोलीस स्टेशन प्रभारी, पोलीस स्टेशन कारंजा, ता. कारंजा, जि. नागपूर ४०००६१ विषय: कारंजा पोलीस स्टेशन येथील कार्यरत बांधवांचे अभिनंदन करण्याबाबत. महोदय, मी स्नेहल कारंजा येथील विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मागच्या आठवड्यात आमच्या शाळेत राबवलेल्या संरक्षण शिबिरामध्ये आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत बांधवांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या अभिनव उपक्रमाविषयी आम्हां विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपणां सर्व पोलीस बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन. महिला सुरक्षेची गरज लक्षात घेता महिलांना निर्भयपणे जगण्याचे स्वातंत्र्य मिळावे याकरता राबवलेला हा अभिनव उपक्रम खरोखरच महिला सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 'महिला सुरक्षा स्वतंत्र ॲप' द्वारे महिला कोणत्याही संकटात असताना पोलिसांशी तत्काळ संपर्क साधू शकतात व पोलीस यंत्रणाही तत्काळ उपस्थित राहून महिलांना सुरक्षा प्रदान करू शकते. त्यामुळे, महिलांना मोकळे पणाने जगता येणे शक्य होईल अशी खात्री या उपक्रमातून मिळते. या अभिनव उपक्रमाबाबत विकास विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने संपूर्ण विद्यालयाच्या वतीने मी आपल्या पोलीस बांधवांचे अभिनंदन करते. आपली विश्वासू, स्नेहल विकास विद्यालय, राजवीर नगर, ता. कारंजा, जि. नागपूर ४०००१६ shefytre242gail.com |