पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
Solution
मागणी पत्र – (औपचारिक)
दिनांक: ७ मार्च २०२१ प्रति, माननीय श्री. गणपत भवरे व्यवस्थापक-वनश्री, कारंजा रोड, वाशिम ४४४००३. विषय: 'सहलीकरता माहिती पत्रकाची मागणी करण्याबाबत.' माननीय महोदय, मी स्नेहल विजयगड येथे राहत असून आपल्या वनश्री सहलीकरता पर्यटक म्हणून येण्यास उत्सुक आहे. आपल्या वनश्री विषयी अनेकांकडून आम्ही स्तुती ऐकली आहे. त्यामुळे, येथे भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे. आपले वनश्री पर्यटनस्थळ हे निसर्गसान्निध्यात रुचकर भोजन, खेळांच्या वैविध्यपूर्ण प्रकारांसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचे ऐकले आहे. शहरी धावपळीपासून काही काळ निवांत जगण्यासाठी अशा ठिकाणी यायला आम्हांला निश्चितच आवडेल. या सहलीसाठी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब असे २५ लोक येऊ इच्छित आहोत; मात्र येण्यापूर्वी या ठिकाणची संपूर्ण माहिती देणारे माहिती पत्रक आम्हांला मिळाले, तर आम्हांला सहलीची रूपरेषा आखण्यास निश्चितच मदत होईल. तरी एक उत्सुक पर्यटक या नात्याने मी आपणाकडे आपल्या वनश्री पर्यटनस्थळाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकाची मागणी करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे. लवकरच हे माहिती पत्रक आम्हांला मिळेल असा मला विश्वास आहे. कळावे, आपली कृपाभिलाषी, स्नेहल, ४०, जया निवास विजयगड, विक्रोळी मुंबई, ४०००१९ |
किंवा
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ८ मार्च २०२१ प्रति, माननीय श्री. गणपत भवरे व्यवस्थापक-वनश्री, कारंजा रोड, वाशिम, ४४४००३ विषय: 'शालेय सहलीकरता विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळण्याबाबत.' माननीय महोदय, मी स्नेहल ज्ञानसंपदा विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे. माझ्या शाळेतील १० वी च्या वर्गातील ७५ मुले आपल्या वनश्रीमध्ये पर्यटनाकरता येण्यास उत्सुक आहेत. शाळेच्या वतीने आयोजित केलेली ही सहल आम्हां विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे. या सहलीकरता आम्हां विद्यार्थ्यांना प्रवेशदरात सवलत मिळाली, तर या सहलीमध्ये माझ्या आणखी विद्यार्थी मित्रांना सहभाग नोंदवता येईल. तरी शालेय विद्यार्थी म्हणून आम्हां सर्वांना प्रवेशदरात सवलत मिळावी अशी मी आपणांस विनंती करत आहे. आपली विश्वासू, स्नेहल विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, जया निवास विजयगड, विक्रोळी मुंबई, ४०००१९ |