पत्रलेखन: खालील निवेदनाच्या आधारे कृती सोडवा.
Solution
मागणी पत्र – (औपचारिक)
दिनांक: १० जून २०२१ प्रति, माननीय.श्री. प्रसाद राजे सरपंच (आयोजक), माझी वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर, ता. वरुड, जि. अमरावती ४०००१७ विषय: 'वृक्षलागवडीकरता रोपांची मागणी करण्याबाबत.' माननीय महोदय, मी स्नेहल करडे गावात राहणारा एक वृक्षमित्र या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. आपण सुरू केलेले 'माझी वसुंधरा अभियान' हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या अभियानामार्फत दरवर्षी १००० वृक्षांची लागवड आपल्या आसपासच्या प्रदेशात केली जाते, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. निसर्गाचा ठेवा जोपासण्याच्या आपल्या या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावा अशी माझी व माझ्या गावकऱ्यांची इच्छा आहे. आमच्या गावाच्या बाजूलाच उघडे माळरान आहे. येथे वृक्षलागवडीकरता उत्तम जागा आहे. आमचे गाव हिरवळीने नटावे, पावसाच्या समस्या दूर व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. तरी आपण आपल्या या वसुंधरा वाचवण्याच्या अनोख्या अभियानात आम्हांला सामावून घ्याल अशी आशा बाळगतो. वृक्ष लागवड कार्यक्रमाकरता आम्हांला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विविध रोपांचे प्रकारांनुसार प्रत्येकी ३ नग १४ जूनपर्यंत आपण पाठवून द्यावेत, जेणेकरून माळरानाच्या परिसरात विविध झाडांची लागवड आम्हांला पावसाळयाच्या प्रारंभीच करता येईल. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य अभियानात सहभागी करून घ्याल अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर आमच्या ग्रामपंचायतीच्या पत्त्यावर पाठवावीत ही नम्र विनंती. कळावे, आपली विश्वासू, स्नेहल वृक्षमित्र, मु. करडे, पो. वनसे ता. वरुड जि. अमरावती ४०००७१ |
किंवा
अभिनंदन पत्र – (औपचारिक)
दिनांक: २६ जून २०२१ प्रति, माननीय सरपंच श्री. प्रसाद राणे आयोजक- माझी वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर, ता. वरुड, जि. अमरावती ४०००७१ विषय: 'माझी वसुंधरा अभियानाचे' आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्याबाबत. माननीय महोदय, मी नम्रता आपल्या गावातील शारदा विद्यामंदिरातील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. १५ जून ते २५ जून या कालावधीत आपण आयोजित केलेले 'माझी वसुंधरा अभियान' हा एक स्तुत्य उपक्रम आहे. गेली पाच वर्षे आपण या अभियानाचे आयोजन करत आहात. यामुळे, आपला गाव व आजूबाजूची गावेही आता हिरवळीने नटली आहेत. आपल्या या पर्यावरणस्नेही कार्याकरता आपले मनापासून अभिनंदन. आपण आयोजित केलेल्या या अभियानाला आता भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या अभियानासोबत अनेक गावे जोडली आहेत. आपण करत असलेले हे कार्य आम्हां विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरत आहे. आपल्या या कार्याबद्दल, उत्तम आयोजनाबद्दल मी शारदा विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपले हार्दिक अभिनंदन करतो. कळावे, आपली विश्वासू, नम्रता विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यामंदिर, नवगाव, सातनूर, ता. वरुड, जि. अमरावती |