पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा
Solution
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ४ फेब्रुवारी २०२१ प्रति, माननीय श्री. रमेश पाटील आयोजक- सुलेखन कार्यशाळा, अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती ४०००१८ विषय: 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत.' माननीय महोदय, मी किरणकुमार बेलसरे, रमाई विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. मी आणि माझ्या वर्गातील काही विद्यार्थीमित्र अक्षर पुस्तकालय, राजापेठ, अमरावती आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत होणाऱ्या सुलेखन कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक आहोत. मागच्या सुट्टीत आपल्या पुस्तकालयामार्फत प्रकाशित 'सुलेखन – एक कला' हे पुस्तक आमच्या वाचनात आले होते. त्यातील बारकावे वाचून आम्ही प्रेरित झालो आहोत. 'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असे म्हटले जाते. आम्हांलाही आमचे अक्षर सुंदर, नीटनेटके व वळणदार करण्याची इच्छा आहे, म्हणून १२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या आपल्या सुलेखन कार्यशाळेत आम्हांला सहभागी व्हायचे आहे. माझ्या वर्गातील माझ्यासह एकूण वीस विद्यार्थ्यांची यात सहभागी होण्याची इच्छा आहे. माझ्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आपणांस विनंती करतो, की माझ्या वर्गातील २० विद्यार्थ्यांना या सुलेखन कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे. कळावे, आपला विश्वासू, किरणकुमार बेलसरे विद्यार्थी प्रतिनिधी, रमाई विद्यालय, ठाकूरनगर, राजापेठ, अमरावती, ४०००११ |
किंवा
अभिनंदन पत्र – (अनौपचारिक)
दिनांक: २८ फेब्रुवारी २०२१ प्रिय अक्षय, सप्रेम नमस्कार. विश्वास सर्वप्रथम तुझे मनापासून अभिनंदन! अक्षर पुस्तकालय आयोजित सुलेखन कार्यशाळेत शेवटच्या दिवशी झालेल्या कौशल्य चाचणीत तू प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालास त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन! अक्षर पुस्तकालयामार्फत राबवले जाणारे सर्वच उपक्रम स्तुत्य असतात. एक अभ्यासपूर्ण आयोजन करणारी संस्था म्हणून ती सर्वपरिचित आहे. अशा संस्थेच्या कार्यशाळेत सहभागी होणे ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. लहानपणापासून पाहतोय मी, तुझे अक्षर म्हणजे मोती. हे अक्षर आणखी सुंदर, रेखीव आणि सुबक बनवण्याकरता या सुलेखन वर्गाचा तुला निश्चितच फायदा झाला असेल. तुझ्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. सुलेखन क्षेत्रात तुझे नाव उज्ज्वल करशील याची खात्री आहे मला. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन! तुझा मित्र, किरणकुमार बेलसरे २०३, वास्तू विठ्ठल, ठाकूरनगर, राजापेठ, अमरावती, ४०००११ |