प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या.
१. मौखिक परंपरा
२. कोरीव लेख
३. लिखित साहित्य
Solution
१. मौखिक परंपरा:
अ. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा मौखिक परंपरेने जपल्या जात असत.
ब. तसेच सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृतीदेखील केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात असत.
२. कोरीव लेख:
अ. भारतामधील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वांत प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे.
ब. मौर्य घराण्यातील सम्रट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसर्या शतकापासून या कोरीव लेखांची सुरुवात होत असून सम्रट अशोकाने हे लेख प्रस्तर आणि दगडी स्तंभांवर कोरले आहेत.
क. त्यानंतरच्या इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनची धातूंची नाणी, ताम्रपट, मूर्ती व शिल्पे इत्यादींवरही कोरीव लेख उपलब्ध आहेत.
ड. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांद्वारे संबंधित राजांचा काळ, त्यांची वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासनव्यवस्था, समाजरचना, महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी, हवामान व दुष्काळ यांबाबत महत्त्वाची माहिती मिळते.
३. लिखित साहित्य:
अ. प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथ, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसेच परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने ही इतिहासाची महत्त्वपूर्ण लिखित साधने आहेत.
ब. या काळातील राजांची चरित्रे आणि राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखनही महत्त्वाचे साधन आहे.
क. याचे उदाहरण म्हणजे इसवी सनाच्या ७ व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले 'हर्षचरित' हे ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपातील संस्कृत काव्य होय. यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे चित्रण केले आहे.
अशा रीतीने, प्राचीन भारतीय इतिहासाचे सर्वतोपरीने ज्ञान होण्यास तत्कालीन साहित्य उपयुक्त ठरते.