नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.
Solution
आमच्या शेजारी विलास नावाचा माझा एक मित्र आहे. तो इंजिनीअर झाला. त्याला इंग्रजी उत्तम येत होते. त्याला परीक्षा संपताच ताबडतोब नोकरी मिळाली. पगार पण तुलनेने चांगला होता. त्याला ऑफिसला नेण्यासाठी रोज गाडी यायची आणि गाडीतून त्याला घरी पोहोचवले जायचे. घराचे सगळे खूश होते. स्वतः विलाससुद्धा खूश होता. कमतरता फक्त एकाच गोष्टीची होती. त्याची नोकरी रात्रपाळीची होती. सुरुवातीला काही दिवस आनंदात गेले. पण थोड्याच दिवसांत परिणाम दिसू लागले. तो दिवसभर झोपून राहू लागला. त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला. उठला की कंटाळलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेत नुसता बसून राहायचा. कोणत्याही प्रकारचे चैतन्य त्याच्या चेहऱ्यावर दिसेनासे झाले. त्यात आणखी एक वेगळीच भर पडली. ऑफिसात रात्रीच्या पार्टी होऊ लागल्या. त्यामुळे त्याला दारू-सिगरेटचे व्यसन जडले. आईवडिलांच्या तोंडचे पाणीच पळाले. नवीन प्रकारच्या कार्यालयीन सवयीने एक वेगळी जीवनशैली घडत होती. त्या वेगळ्या जीवनशैलीचा एक नमुना झाला. असे विविध नमुने आजूबाजूला दिसत आहेत. आणि शेकडो तरुण या नव्या जीवनशैलीला बळी पडत आहेत, हे चित्र निराशाजनक आणि अतिशयोक्तिपूर्ण वाटणे शक्य आहे. पण हे एका तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेले चित्र आहे.
अशी भीषण परिस्थिती पाहिली की वाटते आपण नेमके काय कमावले? हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. त्याचे अनेक फायदे असतील. नव्हे आहेतच. पण दुसऱ्या बाजूने घडत असलेली ही पडझड संपूर्ण माणुसकीलाच नष्ट करणारी आहे. नव्या परिस्थितीतून एक वेगळीच मूल्यव्यवस्था निर्माण होत आहे. यात केवळ पैशाला प्राधान्य आहे. पैसा श्रेष्ठ आहे. पैशानेच सर्व काही मिळते. पैसा नसेल तर आपण शून्य आहोत. या त-हेची विचारसरणी आता सार्वत्रिक होत आहे.
माणसामाणसांमध्ये भावनांचे हृदय स्वरूप आता दिसेनासे होऊ लागले आहे. शेजारीपाजारी, मित्रमंडळी यांच्यातील नाते आता उपयोगापुरते शिल्लक राहिले आहे. एक विचित्र गोष्ट घडत आहे. इथे नोकरी करणाऱ्यांना नोकरी सोडण्याचे एवढे स्वातंत्र्य आहे की, वर्षभरात तरुण भराभर नोकरी सोडतात. या परिस्थितीमुळे आपले काम, आपली कंपनी, आपली संस्था यांच्याबद्दल कोणतीही निष्ठा शिल्लक राहिलेली नाही. कोणत्याही मूल्यावर निष्ठा राहिलेली नाही. माणसावर निष्ठा राहिलेली नाही. व्यवस्थेवर सुद्धा निष्ठा राहिलेली नाही. माणूस पालापाचोळ्यासारखा भिरभिरत आहे.
हे मानवी जीवन नव्हे. हा मानवी जीवनाचा -हास आहे. यातून निर्माण झालेल्या ताणांमुळे मानसिक आजार जडत आहेत. अखंड पिढीच्या पिढी जर अशी आजारग्रस्त झाली तर भीषण अवस्था निर्माण होईल. म्हणून नव्या जीवनशैलीत काहीतरी बदल करणे आवश्यक आहे