उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कोष्टक पूर्ण करा
निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा, नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला, की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते, हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला - 'रडत बसू नको. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.' |
२. आकलन कृती
१. कारण लिहा. (०१)
निरंजन हा भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता, कारण - ______
२. खालील दोन गोष्टींसाठी परिच्छेदात आलेला एक शब्द म्हणजे - (०१)
या विषयाचा पेपर झाला की परीक्षा संपली ______
हा विषय जरा अवघड होता ______
३. स्वमत (०३)
निरंजनचा मामा त्याच्याशी कसा वागला हे परिच्छेदाच्या आधारे लिहा.
Solution
१.
२.
१. निरंजन अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा व अभ्यासही करायचा.
२. या विषयाचा पेपर झाला की परीक्षा संपली नागरिकशास्त्र
हा विषय जरा अवघड होता नागरिकशास्त्र
३. निरंजनचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. ते गेल्यानंतर काही दिवस निरंजनच्या मामाने त्याला सांभाळले. काही काळाने त्याला कामासाठी म्हणून चिपळूणला आणले आणि मावशीकडे नेऊन सोडले. त्यानंतर मामा मुंबईला निघून गेला, तो कायमचाच. जाताना मात्र निरंजनला मोलाचा सल्ला देऊन गेला. मामा म्हणाला, 'रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.' असा सल्ला देऊन मामा निरंजनची जबाबदारी झटकून निघून गेला.