‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
'मराठी असे आमुची मायबोली.' माझी मातृभाषा 'मराठी' मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडीच आहे ! मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, कवी केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनी तिला शब्दलेण्यांनी साकारलेली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण,
भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत, पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे
ठिकठिकाणच्या प्रदेशांतील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळून मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठांवरील लोकसंस्कृतीला जगवते आहे. मराठी भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृतीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
'माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल'
प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा
सार्थ अभिमान अधोरेखित होतो.