उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. चौकट पूर्ण करा. (०२)
मामा गेला तो पुन्हा परतला नाही; मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर रहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की 'जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.' गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. नऊ वाजून गेले होते. साडेदहाची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढंतरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. |
२.आकलन कृती
कारण लिहा. (०२)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण -______
- निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता, कारण - ______
३. स्वमत (०३)
हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात. तुमचे मत स्पष्ट करा.
Solution
१.
१. थोरामोठ्यांकडे वार लावून देणे
२. वह्या पुस्तकांचा खर्च करणे
२.
- तो ज्या मावशीकडे राहत होता तिची परिस्थिती यथातथा होती.
- त्या दिवशी नागरिकशास्त्रासारखा निरंजनला अवघड वाटणारा पेपर होता.
३. परिस्थितीनुसार बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतले तरच आपला टिकाव लागतो. हे जीवनातील सत्य येथेही लागू पडते. ज्यांना हक्काचे घर नसते अशा मुलांना इतरत्र कोठेही आपला निवारा शोधावा लागतो. हा निवारा कधीपर्यंत सोबत असेल याची खात्री नसते. त्यामुळे आहे ते टिकवून ठेवण्याकरता, परिस्थितीशी जुळवून घेत, प्रसंगी आपल्या आनंदाचा, इच्छा-आकांक्षांचा त्याग करून जीवन कंठावे लागते. हे जुळवून घेणे, शिकवावे लागत नाही, तर परिस्थितीनुसार ते आपसूकच घडून येते. त्यामुळे, हक्काचे घर नसलेली मुले इतरत्र राहताना परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात.