उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१.
i. आकृती पूर्ण करा. (०१)
लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकांची ऐकू येणारी बोलणी- ______
ii. चौकट पूर्ण करा. (०१)
लेखकाची आस्था ज्या शब्दांबद्दल वाढू लागली ते शब्द- ______
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण ' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पाैंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळयांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर. |
२. कोण ते लिहा. (०२)
१. लेखक पूर्वीसारखे गाढ झोपत नाही यावर विश्वास न ठेवणारी ______
२. लेखकाला डाएटचा सल्ला देणार ______
३. स्वमत कृती (०३)
तुम्ही केलेल्या एखाद्या भीष्मप्रतिज्ञेबद्दल माहिती लिहा.
Solution
१.
- लेखकाची 'नाही ती भानगड आहे', 'उगीच हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!'
- प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये.
२.
- लेखकाची धर्मपत्नी
- सोकाजी त्रिलोकेकर
३. मी पाचवीत होतो त्या वर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती येऊ घातली होती. त्यावेळी ठरवले, की मी एकतरी रोपटे लावेन आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घेईन. त्यावर्षी वाढदिवसाचा खर्च मी टाळला. त्यातून बाबांच्या मदतीने रोप आणून ते लावले, हा साऱ्या कुटुंबियांसाठी एक आनंदाचा क्षण होता. त्या रोपाला रोज पाणी घालणे, माती ठीक करणे यात एक वेगळेच समाधान मिळू लागले. आपण लावलेल्या त्या रोपट्याचे वर्षभरातच बहरलेले ते रूप पाहून मला खूप आनंद झाला. दर वाढदिवशी असेच एक झाड लावून त्याची निगा राखण्याची भीष्मप्रतिज्ञा मी केली. याचा परिणाम म्हणून आज मी लावलेली पाच झाडे माझ्या अंगणात डौलाने उभी आहेत. त्यांची टप्प्याटप्प्याने होणारी वाढ पाहून मन रोज आनंदाने फुलून येते.