उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. उपास हे कोणाचे खास कुरण होते?
२. लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला कोणी सुरुंग लावला?
“उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वत:च कमवून खातो म्हणावं. वाढलं तर तर वाढू दे वजन.” मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षयसंकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. “लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!” “इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!” तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच! दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यादा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते. “हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.” |
२. आकलन कृती
१. खालील घटनेचा परिणाम लिहा. (०१)
घटना: लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली.
परिणाम: _____
२. पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा. (०१)
बाबा बर्व्यांचा लेखकावर आधीपासूनच राग होता.
३. स्वमत (०३)
'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?
Solution
१.
- उपास हे आचार्य बर्व्यांचे खास कुरण होते.
- लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला लेखकाच्या पत्नीने सुरुंग लावला
२.
१. लेखकाचा दिवाणखाना लहान असल्याने तेथे ड्रेसिंग टेबलवरील बाटल्या खाली पडल्या, तर दुसऱ्यादा अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात राहून दोरीउडी मारली असता दोरी आचार्य बर्वेच्या गळ्यात पडली.
२. सत्य
३. हो. मी लेखकाच्या या मताशी सहमत आहे. लेखकाने डाएट सुरू करायचा निर्धार व्यक्त करताच चाळीतल्या लोकांनी त्यांनी काय खाऊ नये याची ढीगभर मोठी यादीच समोर मांडली. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक शेजाऱ्याने एक वेगळा पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, नक्की जगण्यासाठी काय खावे असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच होते. प्रत्येकाची मते शांतपणे ऐकून घेऊन लेखकाने मात्र स्वत:च स्वत:चे आहारव्रत सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक ना धड भाराभर चिंध्या होण्यापेक्षा स्वत: विचार करून, वाचन करून, माहिती मिळवून योग्य प्रकारे आहारव्रत पार पाडण्याचा लेखकांचा हेतू येथे स्पष्ट होतो. त्यामुळे, हवी तशी मतं मांडणाऱ्या शेजाऱ्याच्या विचारांना न जुमानता स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा लेखकाचा निर्धार मला पटतो.