कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
Solution
'पैंजण' या कवितेत कवयित्री नीलम माणगावे यांनी चितारलेली आजी व आजच्या युगातील आधुनिक आजी यांच्या कौटुंबिक स्थानांत जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे.
कवितेत वर्णन केलेल्या आजीच्या पायात अवजड पैंजण होते, म्हणजे रूढीपरंपरेच्या भोवऱ्यात ती जखडलेली होती. त्या काळातील समाजव्यवस्था, सामाजिक मूल्ये व कौटुंबिक व्यवस्था यांनी आजीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. स्वयंपाकघर व माजघर हीच तिची हद्द होती. आणि 'चूल व मूल' हा तिचा एकांगी संसार होता. तिला बाहेरच्या अंगणातही डोकावण्याची मुभा नव्हती नि बाहेरचे जग तिला पारखे होते. म्हणून रूढींचा जुलूम निमूटपणे सोसत कवितेतली आजी जीवन जगत होती. तिच्या मनातील भावना व विचार यांच्या प्रकटीकरणाला मज्जाव होता.
आजची आजी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. ती घरात व घराबाहेर स्वतंत्रपणे वावरू शकते. स्त्री-शक्ती जागृत झाल्यामुळे ती स्वत:चे विचार मुक्तपणे मांडू शकते. सामाजिक कार्य करू शकते. घरातील नातवंडांपासून मोठ्यांपर्यंतचा गोतावळा समर्थपणे पेलू शकते. तिला कुठलाही अटकाव नाही. ती हवा तसा पेहराव व दागदागिने घालू शकते. कुठल्याही कौटुंबिक व सामाजिक जोखडामध्ये ती बंदिस्त नाही. ती अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकते. पुरुष-स्त्री समानता मूल्य ती मानते, त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन आपले कर्तृत्व आजच्या आजीने सिद्ध केले आहे.