कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
Solution
(१) कथाबीज : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण आत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय.
उदा., पुढील कथाबीज पाहा : 'हा आपलाच मुलगा आहे', असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात.
(२) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच संगीत. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवेदावे वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असते. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो.