खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल?
Solution
अपवर्तनी दूरदर्शक
Fo : पदार्थ भिंगाची मुख्य नाभी,
Fe : नेत्रिकेची मुख्य नाभी,
fo : पदार्थ भिंगाचे नाभीय अंतर,
fe : नेत्रिकेचे नाभीय अंतर.
अपवर्तनी दूरदर्शी रचना :
(१) अपवर्तनी दूरदर्शी मध्ये दोन बहिर्वक्र भिंगे असतात. त्यांपैकी अधिक नाभीय अंतर व अधिक व्यास असलेले भिंग पदार्थ भिंग म्हणून काम करते, तर कमी नाभीय अंतर व कमी व्यास असलेले भिंग नेत्रिका म्हणून काम करते.
(२) पदार्थ भिंग हे धातूच्या लांब नळीच्या तोंडावर बसवलेले असून, या नळीमध्ये पुढे-मागे सरकवता येईल अशा बेताने एक कमी व्यासाची नळी बसवलेली असते. या नळीच्या बाहेरील तोंडावर नेत्रिका बसवलेली असते. पदार्थ भिंग व नेत्रिका यांचे मुख्य अक्ष एका सरळ रेषेत असतात. हे उपकरण बहुधा एखाद्या स्टँडवर उभारलेले असते.
कार्य :
(१) पदार्थ भिंग दूरच्या वस्तूकडे रोखले असता, दूरच्या वस्तूकडून येणारे बव्हंशी समांतर प्रकाशकिरण पदार्थ भिंगातून जाऊन दूरच्या वस्तूची वास्तव, उलट व लहान प्रतिमा पदार्थ भिंगाच्या नाभीय प्रतलामध्ये तयार होते.
(२) त्यानंतर, नेत्रिकेपाशी डोळा ठेवून नेत्रिका असलेली नळी स्क्रूच्या साहाय्याने पुढे-मागे अशी सरकवतात की, पदार्थ भिंगाद्वारे तयार झालेली वास्तव प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीय अंतराच्या आत पडते. मूळ वस्तूपेक्षा या वास्तव प्रतिमेने डोळ्याशी केलेला कोन मोठा असतो व ती नेत्रिकेसाठी वस्तू म्हणून काम करते. त्यामुळे नेत्रिकेपाशी डोळा धरून पाहिले असता, या प्रतिमेपासून आभासी व विशालित अशी प्रतिमा दिसते. परिणामतः दूरच्या वस्तूच्या अंगोपांगांचे निरीक्षण करणे शक्य होते. पदार्थ भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीय प्रतलात असल्यास अंतिम प्रतिमा अनंत अंतरावर तयार होते.