खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
विज्ञानाची कास धरा
Solution
विज्ञानाची कास धरा |
२०१६ला गावात दुष्काळ पडला. पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. गावातील लोकं चिंतीने बेहाल झाले. वेगवेगळया पद्धतीने पूजा, होम-हवन सुरू झाले. अशातच गावात एक साधू आला. त्याने गावात वेगवेगळया प्रकारच्या तंत्रमंत्राचे प्रयोग दाखवण्यास सुरुवात केली. साऱ्या गावकऱ्यांना त्याने गावाबाहेरील मंदिरात एकत्र केले. गावावर आलेले संकट आपण दूर करू शकतो, कारण आपल्याला त्याचे कारण सापडले आहे असे म्हणत तो जोरजोराने घुमू लागला. गावच्या सरपंचाकडे त्याने पूजाविधीसाठी २ लाख रुपयांची मागणी केली. गावावरचे संकट टळावे म्हणून नाइलाजाने सरपंचांनी त्याचे म्हणणे मान्य केले. त्या साधूने स्वतः समोर लिंबू ठेवले होते. साधू जोरजोराने ओरडत होता. “गावावर कोणीतरी करणी केली आहे. बघा आता, मी या लिंबूमध्ये टाचण्या टोचतो. लिंबू कसा उडू लागेल ते पाहा.” त्याने टाचण्या टोचल्यावर लिंबू खरोखर उडू लागला. साधूने आपल्या शिष्याला एक सुरी आणावयास सांगितली. साधूने सुरी हातात घेऊन म्हटले, “बघा आता या लिंबूमधून रक्त बाहेर पडेल.” साधूने सुरीने लिंबू कापला आणि काय आश्चर्य लिंबूतून खरोखर लाल रंगाचा द्रव बाहेर आला. सारे गावकरी साधूचा जयकार करू लागले. अंकुर एका कोपऱ्यात उभे राहून हे सारे पाहत होता. साधूची लबाडी त्याच्या लक्षात आली. पारा आणि लिंबू यांच्यात रासायनिक क्रिया झाल्यामुळे लिंबू उडतो हे तो विज्ञानाच्या तासाला शिकला होता. तसेच, त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी लिंबाच्या रसात आम्ल असते हे शिकवले होते. तो पुढे आला आणि म्हणाला, “सरपंच साहेब हे सगळे थोतांड आहे. या साधूने केलेला हा कोणताही चमत्कार नाही, तर केवळ विज्ञानाचा प्रयोग आहे. मी हे सिद्ध करू शकतो. या साधूला आपण टाचण्या दिल्या, तर तो लिंबू उडेल का विचारा?” आपण दिलेल्या सुरीने कापून लिंबातून रक्त येईल का? सरपंचाने अंकुरच्या म्हणण्याप्रमाणे साधूला विचारताच साधू चिडीचूप झाला. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हाती केले. अंकुरचे सर्वांनी कौतुक केले. तात्पर्य: विज्ञानाची कास धरल्यास, माणूस फसवणुकीला आणि अंधश्रद्धेला बळी पडत नाही. |