खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे
Solution
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे |
पावसाळयाचे दिवस सुरू होते. दोन दिवस खूप पाऊस पडत होता. त्या पावसातच बळीराम नावाचा एक गाडीवान बैलगाडीत बसून दुसऱ्या गावी निघाला होता. आधीच मातीचा खडकाळ रस्ता, आता पावसामुळे चिखलाने भरून गेला होता. मोठ्या कष्टानेच बळीराम गाडी हाकत होता. जाता जाता त्याची बैलगाडी चिखलात रुतली. बैलांनी खूप जोर लावला; पण व्यर्थ! बैल खालीच बसले. बळीराम मोठ्याने रडू लागला. “मला कोणीतरी मदत करा हो! माझी गाडी चिखलात रुतली. आता मी काय करू? मी पुढे कसा जाऊ? देवा! माझी गाडी चिखलातून वर काढ. मी तुझ्यापुढं नारळ फोडीन.” खूप वेळ गेला. जंगलातून जाणाऱ्या त्या वाटेवरून कोणीही येत-जात नव्हते. तो तसाच बसून होता. अखेर आकाशवाणी झाली. “अरे आळशी माणसा, रडून काय होणार? उठ, बैलांना हाक दे! तू स्वत: गाडीची चाकं वर काढण्याचा प्रयत्न कर. मी आळशी आणि रडणाऱ्या माणसांना मदत करत नसतो. मला धाडसी व कष्टाळू माणसं आवडतात.” बळीरामाने डोळे पुसले. तो बैलांना हाक मारायला लागला. स्वत: गाडीची चाके वर काढण्याचा प्रयत्न करू लागला. सगळी शक्ती एकवटून त्याने जोर लावला आणि आश्चर्य म्हणजे क्षणात त्याची गाडी चिखलातून बाहेर आली. बळीरामला खूप आनंद झाला! त्याने देवाचे आभार मानले व तो पुढच्या प्रवासाला निघाला. तात्पर्य: प्रयत्न केल्यावरच कोणतीही गोष्ट प्राप्त होते. |