खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज
Solution
पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज |
रामगड गावातली माणसं फार कष्टाळू होती. खूप कष्ट करुन धान्य पिकवायची आणि एकमेकांशी, प्रेमाने वागायची. त्या गावाशेजारी एक नदी होती. त्या नदीला खूप पाणी होते. माणसे, प्राणी त्या नदीचे पाणी पित. जंगलातील हत्ती नदीवर येऊन दंगामस्ती करत, पाण्यात डुंबत. सर्वत्र आनंदी होत. अचानक पाऊस पडायचा थांबला. सगळीकडे दुष्काळ पडला. जंगले ओसाड होऊ लागली. प्राणी हैराण झाले. यामुळे एक हत्ती वैतागला, त्याला पाण्यात डुंबायला मिळत नव्हते. तो नदीला विचारायला गेला. त्याने नदीला विचारले. तू आता का बरं वाहत नाहीस? तुझ्यात पाणी का साचत नाही? मला त्यामुळे डुंबायला मिळत नाही. त्यावर नदी म्हणाली, “अरे काय सांगणार बाबा. आता ढग इथे थांबत नाहीत. त्यामुळे, येथे पाऊसच पडत नाही. मला तरी पाणी कसे मिळणार? तू ढगालाच जाऊन विचार.” हत्तीने मान हलवली. तो गेला ढगाकडे. त्याने ढगाला विचारले, “ढगदादा तू रुसलास का? पाऊस पाडायचे विसरलास का? तू नदीला पाणी देत नाहीस, त्यामुळे मला डुंबता येत नाही.” त्यावर ढग म्हणाला, “अरे आम्ही नाही कुठे म्हणतो पाणी द्यायला; पण आमचे मित्र आम्हांला अडवायला तिथं नाहीत. झाडे नाहीत मग आम्ही थांबत नाही. माणसाने झाडे तोडली. जंगले उजाड केली. तू माणसाला विचार.” हत्तीने माणसाला म्हटले, “तुम्ही झाडे तोडली. नवी झाडे लावली का नाहीत?” माणूस म्हणाला, “आमच्या हातून चूक झाली. आम्ही झाडे लावली नाहीत, म्हणून ढग थांबत नाहीत. त्यामुळे, पाऊस नाही. नदीला पाणी नाही. आम्ही नवीन झाडे लावू. त्यांची काळजी घेऊ. जंगल हिरवेगार करू. झाडांमुळे गारवा येईल. पाऊस पडेल. सारे सजीव सुखी होतील, शेती भरभरून पिकेल. याशिवाय, आपल्याला वीजही मिळेल. उद्योगधंदेही वाढतील.” हत्ती म्हणाला, “छान! माणसा तुला तुझी चूक कळली हे बरं झालं. पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज आहे. हे लक्षात घे आणि पुन्हा अशी चूक करू नकोस. नाहीतर तुझ्यासह आम्ही आणि पर्यायाने संपूर्ण सृष्टी नष्ट होईल.” तात्पर्य: पर्यावरणाचे रक्षण करून पृथ्वीवरील सजीवसृष्टी आनंदीत राहील. अन्यथा विनाश नक्की आहे. |