खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
एकीचे बळ
Solution
एकीचे बळ |
रामगड नावाचं डोंगरात लहानसं गाव होतं. इतर वस्तीपासून हे गाव दूरच आणि उंचावर होतं. गावात शाळा नव्हती. गावातील काही मोजकीच मुलं आठ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जात. मुलींना तर घरातील लोक एवढ्या लांब पाठवायला तयार नसत. त्यामुळे, बरीच मुले शिक्षणापासून वंचित होती. 'अंकुर' हा त्याच गावातील लोहाराचा मुलगा. त्याला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण घरापासून आठ किलोमीटरवर असलेल्या शाळेतून घेतले. पुढे शिष्यवृत्ती मिळवून शहरातील शाळेत वसतिगृहात राहून तो उच्चशिक्षित झाला. सरकारी शाळेत नोकरीत रुजू झाला. सारं काही सुखाचं झालं; पण अंकुरला आपल्या गावातील स्थिती स्वस्थ बसू देईना. त्याला काहीही करून गावात शाळा बांधायची होती. त्याने बरीच खटपट केली; पण कोणीही या गावात शाळा सुरू करण्याकरता त्याला मदत केली नाही. शेवटी अंकुरने एक निर्णय घेतला. आपली थोडीफार जमलेली जमापुंजी घेऊन तो गावी आला. गावात त्याने सगळयांना जमा करून आपण सगळे मिळून शाळा उभारू शकतो असा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. सुरुवातीला कोणालाच हे शक्य होईल असं वाटलं नाही; पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न केले, तर हे शक्य होईल हे अंकुरने सर्वांना पटवून दिले. अंकुरने त्याची सगळी जमापुंजी शाळेच्या इमारतीसाठी दिली. त्याकरता तो स्वत: मेहनत करत होता. गावातील गवंड्याने त्याला मदत केली. वीटभट्टीच्या मालकाने बांधकामाकरता विटा देऊ केल्या. सुतार, लोहार, कुंभार, रंगारी अशा साऱ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला. गावातील प्रत्येक व्यक्ती जोमाने काम करू लागली. आबालवृद्ध सारे यात सहभागी झाले आणि पाहतापाहता शाळेची इमारत उभी राहिली. सर्व सुखसोईंनीयुक्त शाळा, त्यात अंकुरसारखा गुणी शिक्षक लाभल्याने गावकऱ्यांना खूप आनंद झाला. गावातली सारी मुलं आणि मुली रोज शाळेत जाऊ लागली. शिक्षणाने गावात हळूहळू समृद्धी आणली. अंकुरने तर प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केले. त्यामुळे, संपूर्ण गाव शिक्षणाच्या वाटेवर चालू लागले. एकीचे बळ असेल, तर आपण अवघड गोष्टीही साध्य करू शकतो हे सर्वांनाच पटले. तात्पर्य: एकत्र काम केल्याने काम सोपे होते. |