खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
ऐकावे जनाचे करावे मनाचे
Solution
ऐकावे जनाचे करावे मनाचे |
माणगांवात एक कुंभार आणि त्याचा मुलगा राहत होता. त्यांच्याकडे एक गाढव होते. एकदा ते आपल्या गाढवाला घेऊन बाजाराला जात होते. गाढव पुढे चालत होते आणि त्याच्यामागे बाप लेक चालले होते. उन्हाळयाचे दिवस असल्याने पायाला चटके बसत होते. एवढ्यात समोरून काही लोक चालत येताना दिसले. ते कुंभार आणि त्याच्या मुलाकडे पाहून म्हणाले, “काय फायदा गाढव असून? मुलाला एवढ्या उन्हात चालतच घेऊन जातोय हा कुंभार.” कुंभाराने ते ऐकले आणि मुलाला गाढवावर बसवले. थोडे अंतर चालून गेल्यावर काही लोक पारावर बसलेले दिसले. कुंभार तिथून जाऊ लागताच त्यातील एक जण ओरडला, “काय दिवस आले आहेत, मुलगा मजेत गाढवावर बसला आहे आणि म्हातारा बाप रस्त्याने चालतोय.” मुलगा पटकन खाली उतरला. त्याला खूप वाईट वाटले. त्याने आपल्या बाबांना गाढवावर बसायला सांगितले. थोड्याच अंतरावर पुन्हा काही लोक भेटले. त्यांनी कुंभाराला जोराने ओरडून म्हटले, “अरे काही लाज आहे की नाही? मुलगा पायी चालतोय आणि तू आरामात गाढवावर बसून जातोस.” कुंभार मुलाला म्हणाला, “बाळ, तू पण ये, गाढवावर आपण दोघेही बसू.” त्याप्रमाणे दोघेही गाढवावर बसून पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना अजून एक माणूस त्यांना भेटला. त्याने कुंभाराला थांबवले आणि त्याच्या अंगावर खेकसला, “तुम्ही मुक्या जनावरांची काळजी कधी घेणार? दोघे दोघे त्याच्या पाठीवर बसून त्या गाढवाचा जीव घेणार का?” कुंभाराला वाटले आपले चुकलेच. ते दोघे गाढवावरून उतरले आणि दोघांनी त्या गाढवालाच आपल्या खांद्यावर घेतले. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघून फिदीफिदी हसत होते आणि माणूस कोण अन् गाढव कोण कसं ओळखायचं? असे म्हणत होते. शेवटी कुंभाराने गाढवाला खाली उतरवले आणि तो त्याच्यामागे मुलासह चालू लागला. यापुढे लोक काय म्हणतात हे ऐकून घेतले तरी वागताना मात्र आपल्याला काय वाटते, त्याप्रमाणेच आचरण करायचा निर्धार करून तो पुढच्या प्रवासाला लागला. तात्पर्य: ऐकावे जनाचे; पण करावे मात्र मनाला जे योग्य वाटते तेच. |