खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’
Solution
'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटू न देता निसर्गसाैंदर्याचा खराखुरा आनंद घ्यावा असा विचार यात व्यक्त होतो.
हिरवीगार सृष्टी पाहताना, हिरव्या रंगाच्या विविध छटा डोळ्यांत साठवताना मनेही हिरवीगार होऊन जातील असे कवयित्री म्हणते. ही हिरवळ समृद्धी, शुद्धता, आनंद यांचे प्रतीक असते. ती स्वत:मध्ये सामावून घेतल्यास आपली मनेही शुद्ध, समृद्ध आणि आनंदाने भरलेली होतील. पावसामुळे आलेल्या समृद्धीमुळे निर्माण होणारी मनातील भावनिक आंदोलने एक कोवळी, लुसलुशीत, रेशमी सळसळ मनात निर्माण करतील. या झाडांच्या नुकत्याच उमललेल्या कोवळ्या, तुकतुकीत, लुसलुशीत पानांच्या सळसळण्यातून आपण विश्वाला पर्यावरण संवर्धन व संगोपनाचा संदेश देत राहू, असा आशय कवयित्री वरील ओळींद्वारे मांडत आहे.