खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
Solution
मी बनवलेला पहिला पदार्थ
हलवा माझे आवडते पक्वान आहे. तसे ते अनेकांचे आहे, पण माझे विशेष आहे. त्यादिवशी घरी कोणीच नव्हते. फक्त मी आणि आई. संध्याकाळची वेळ होती. आई म्हणाली, “माझं डोकं फार ठणकतंय रे.” मी कसा काय ते चटकन म्हणालो, “आई, मी चहा करून देऊ का?” आई हसून म्हणाली, “तू चहा करणार?” मी म्हटले, “त्यात काय एवढे? तू सांग, मी बनवेन.” आईने ठीक आहे म्हटल्यावर मी तयारीला लागलो.
आजपर्यंत मी कोणताही पदार्थ बनवला नव्हता. साखर, चहापावडर, चहाचे भांडे, दूध सारे बाहेर काढले. छान आलं घातलेला चहा करायचा म्हणून एक आल्याचा तुकडा फ्रिजमधून काढला. आईने पाणी गरम करताना गॅस कसा पेटवायचा हे शिकवले होते. त्यामुळे, गॅस पेटवला. त्यावर चहाचे भांडे ठेवले. आईला विचारून त्यात पाणी टाकले. पाण्याला उकळ आल्यानंतर चहापावडर, दोन चमचे साखर आणि आलं टाकलं.
चहा बनवण्याचा आनंद फारच वेगळा होता. मला तर असे वाटत होते, की किती सोपं आहे, चहा बनवणं. त्यात आईचं डोकं दुखतंय म्हणून मी स्वत: तिला चहा बनवून देत होतो, याचे एक विलक्षण समाधान वाटत होतं. चहाला चांगलाच उकळ आला. चहा तयार झाला हे माझ्या लक्षात आले. आई शांतपणे पडून होती. चहा देण्यासाठी मी कप बाहेर काढले. फ्रिजमधून काढलेले दूध गरम करत ठेवले. गॅस बंद केला. दोन्ही कपांमध्ये दूध ओतून गाळणीने त्यावर चहा गाळून घेतला. दोन हातांमध्ये दोन कप घेऊन मी विजयी वीरासारखा आईला चहा घेऊन आलो.
गरमागरम, वाफाळलेला चहा. माझा पहिला पदार्थ आणि मी पहिलाच पदार्थ उत्कृष्ट बनवला म्हणून आईकडून शाबासकी मिळणार. सारे कौतुक करणार. आईला चहाचा कप दिला आणि स्वत:चे कौतुक ऐकण्यासाठी ती कधी एकदा चहाचा घोट घेते हे बघत बसलो.
आईने चहाचा घोट घेतला आणि तोंड वेडेवाकडे करत ती बेसिनकडे पळाली. मला समजेना. काय झाले? मला माझ्या हातातील चहा पिण्याचा धीर होत नव्हता. मी आईला विचारले, “आई, काय झाले गं? चहा कडू झाला का? साखर कमी पडली का?” आई बाहेर आली ती जोरजोराने हसतंच आणि म्हणाली, “अरे वेंधळ्या, साखर पडलीच कुठे चहात.” मी म्हणालो, “अगं आई, मी टाकली ना. चांगली दोन चमचे टाकली.” यावर हसून आई म्हणाली, “जरा स्वयंपाकघरात जाऊन बघ. तू साखरेऐवजी मीठ घातलंस चहामध्ये.”
मोठ्या उत्साहाच्या भरात साखरेच्या डब्याऐवजी मिठाचा डबा उघडून दोन चमचे मीठ मी चहात घातले होते. माझी चांगलीच फजिती झाली होती. मग मात्र हसून हसून आमची पुरेवाट झाली; पण मी बनवलेला पहिला पदार्थ कायम माझ्या आठवणीत राहिला.