खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
Solution
भाषेचे महत्त्व
भाषे विषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. माणूस हा एक प्राणीच आहे; मात्र तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. त्याने आपली प्रगती साधली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला मिळालेली भाषेची देणगी. माणसाला भाषा बोलता येऊ लागली, त्या भाषेला विविध आकारांच्या साहाय्याने त्याने लिपीबद्ध केले आणि माणूस आपले विचार लिहून ठेवू लागला. माणसाला भाषा बोलता येते. त्यामुळे, त्याच्या विचारातील सुस्पष्टता इतरांना कळते. प्राण्यांची, पक्ष्यांची आवाजाची भाषा असते; मात्र माणसांच्या भाषांसारखी ती सुसंगत, सुस्पष्ट नसते.
सर्वसाधारण व्यवहारात 'भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण कशाचा नेमका अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. माणसाचे जीवन समृद्ध होण्यात त्याला गवसलेल्या भाषेचे खूप मोठे योगदान आहे. आपल्याला काय वाटते, समोरचा काय बोलतो? त्याचे विचार समजून घेण्यासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आपल्या विचारांचे आदान-प्रदान करण्यात भाषेचा मोठा वाटा आहे. भाषेमुळे माणसाने खूप मोठी प्रगती केली. आदिमानव ते आताच्या युगातील हायटेक मनुष्य यांमधील काळ हा भाषेमुळे माणसाची होत गेलेली प्रगती दर्शवतो. वेगवेगळे विषय, शास्त्रे, शोध, वस्तूंची निर्मिती या साऱ्यांचे मूळ भाषेमध्ये आहे.
भाषा ही संज्ञा विविध अर्थांनी वापरली जात. लहान बाळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींकडून भाषा शिकते. त्याच्या आजूबाजूला बोलले जाणारे शब्द आत्मसात करून वस्तू, व्यक्तींची नावे ते बाळ लक्षात ठेवते. पुढे आजूबाजूची मंडळी आणि शाळा यांद्वारे शब्दसंपदा वाढत जाते. त्याबरोबरीने ज्ञानही वाढते. अनेक व्यक्ती विविध प्रदेशांना भेटी देऊन नव्या भाषा शिकून, प्रचंड वाचन करून आपली शब्दसंपदा वाढवतात. विविध कलाकृती, काव्ये, महाकाव्ये, संगीत, नाटक, चित्रपट, वर्तमानपत्रे या साऱ्यांना भाषेचा खूप मोठा आधार आहे. भाषेचे स्वरूप देखील माणसाच्या प्रगतीप्रमाणे बदलत जाते. भाषेत नव्या शब्दांची भर पडते. ज्याप्रमाणे नवे शोध लागतात त्याप्रमाणे शब्दभांडार वाढत जाते. विश्वकोश, ज्ञानकोशदेखील शब्दभांडार विकसित करण्यास उपयुक्त ठरतात.
माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर मानवाला व्यवहार करताना भाषेचा उपयोग होतो. वस्तूंचे आदानप्रदान, उद्योग इत्यादींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी भाषा दुवा म्हणून कार्य करते. व्यवहारात वापरली जाणारी भाषा ही त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलत जाते. भाषेतील हा बदल काळाची गरज असते. अशारीतीने, माणूस म्हणून इतरांहून भिन्न प्रकारे जगताना भाषा त्याचे जीवन सुकर करते. भाषेने वेळोवेळी आपले रूप बदलले आहे. ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठी आणि आजची मराठी यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. भाषा टिकून राहण्यासाठी तिने होणारे बदल स्वीकारले पाहिजेत. त्याचबरोबर ती व्यवहार्य असली पाहिजे. बोलण्यासाठी सोपी, रोजच्या वापरातील, शब्दसंपदा विपुल प्रमाणात असणारी भाषा माणसाच्या उन्नतीचे कारण बनते. ही व्यवहारात उपयुक्त ठरणारी भाषा सहजसोपी, सरळ, काळानुरूप असल्याने ती जनमाणसांत रूजते.