खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
Solution
कवी ज. वि. पवार यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव म्हणून ही कविता लिहिली आहे. रूढ धार्मिक व सामाजिक बंधनांना झुगारणाऱ्या, नव्या समाजाचा पाया उभारणाऱ्या बाबासाहेबांना या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत समाजाच्या उन्नतीचे कार्य जेव्हा हाती घेतले, तेव्हा समाजात अज्ञानाचा काळोख पसरलेला होता. या काळोख्या साम्रज्यात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज होती. बाबासाहेब तो मार्गदर्शक बनले. त्यांनी पारंपरिक वाट नाकारली. नव्या समाजाची जडणघडण करण्याकरता, बहिष्कृतांना आत्मसन्मान मिळवून देण्याकरता त्यांनी नवी वाट शोधली. त्या वाटेवर त्यांना असंख्य अडचणी, कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. हाती घेतलेल्या कार्याची सुरुवात करताना त्यांनी रूढ, सामाजिक परंपरांविरुद्ध बंड केले. नवा मार्ग स्वीकारला. तेथे त्यांचे स्वागत खाचखळग्यांनी म्हणजेच, अनंत अडीअडचणींनी केले असा आशय वरील काव्यपंक्तींतून व्यक्त होतो.
प्रस्तुत ओळींतून वाचकास वीररसाचा प्रत्यय येतो. काळोख, सूर्यफुले, मळवाट इत्यादी प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक आगळे परिमाण दिले आहे. अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता व महानता वाचकांपर्यंत पोहोचते. या समाजप्रबोधनपर कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे कवितेतील कवीचे मनोगत थेट रसिक वाचकापर्यंत पोहोचते. कवीने संवादपर शैलीत भाष्य केल्यामुळे जणू काही कवी डॉ. आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. या संवादशैलीमुळे कवितेच्या साैंदर्यात भर घातली गेली आहे.