खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।
Solution
'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासानी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. तिने कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा खुलासा यातून केला आहे.
माणसाने नेहमी स्वत:च्या प्रतिमेस जपावे. स्वत:ची अपकीर्ती पसरेल असे वर्तन कधीही करू नये. नेहमी चांगले कर्म करून स्वत:ची कीर्ती वाढवावी. अशाप्रकारे, माणसाने आपल्या योग्य वर्तनातून स्वत:चा उत्कर्ष साधावा, असा आशय प्रस्तुत काव्यपंक्तींतून व्यक्त होतो.
प्रस्तुत रचना संतकाव्य आहे. हे उपदेशपर काव्य आहे. यातून शांतरसाचा अनुभव मिळतो. प्रस्तुत काव्यपंक्तींत विरुद्धार्थी शब्दांची योजना केलेली आहे. त्यामुळे, काव्यसाैंदर्यात भर पडली आहे. उदा. अपकीर्ति - सत्कीर्ति. ही साडेतीन चरणांची ओवी आहे. पहिल्या तीन चरणांमध्ये 'वी' या अक्षराची पुनरावृत्ती होऊन कविता नादमय झाली आहे. 'व' या अक्षराच्या पुनरावृत्तीने अनुप्रास अलंकार साधला आहे. रामदासकालीन मराठी भाषेचा गोडवा व आंतरिक लय यांमुळे ही रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.