काव्यसौंदर्य.
‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Solution
'समुद्र कोंडून पडलाय' या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत.
महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात. समुद्र म्हणजे अफाट जीवन! ते आजमितीला शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजांआड कोंडून पडले आहे. या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताश होऊन बसतो. त्या वेळी त्याच्याच शेजारी त्याच बाकड्यावर एक मूल पाय छातीशी दुमडून झोपलेले त्याला आढळते. त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण त्या बाकाएवढेच संकुचित असलेले जाणवते. पण झोपी गेलेल्या मुलाला या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी, ही शंकाही समुद्राच्या मनात डोकावते.
भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या भगभगीत संस्कृती उजाड व सिमित झाले आहे, हा विचार हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांत कवीने सशक्तपणे मांडला आहे.