खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)
जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.
Solution
चिमणी आणि हत्ती |
जंगलात एका झाडावर एक चिमणी आणि चिमणा आनंदात राहात होते. चिमणा-चिमणीच्या या दोघांनी मिळून आपले घरटे झाडाच्या फांदीवर बनवले होते. चिमणीने त्यात अंडी दिली होती. थोड्याच दिवसांत त्या अंड्यांतून छोटी पिले बाहेर आली. चिमणा-चिमणीचा आनंद गगनात मावेनासा झालेला. चिमणी घरट्यात बसून पिल्लांची काळजी घ्यायची, तर चिमणा आपल्या पिल्लांसाठी काहीतरी खायला घेऊन यायचा. त्या दोघांच्या संसारात आलेल्या नव्या पाहुण्यांच्या आगमनाने त्यांची कामाची धावपळ खूप वाढली होती. एके दिवशी त्याच जंगलातला एक हत्ती आपल्याच मस्तीत फिरत होता. कधी फांदी वाकव, कधी झाडच मुळासह उपटून टाक असा धुमाकूळ घालत तो जंगलभर फिरत होता. त्या अवस्थेत त्याला कशाचेही भान नव्हते. नंतर तो चित्कार करतच तो चिमणीचे घरटे असलेल्या झाडापाशी आला. चिमणीचे घरटे असलेली फांदी आपल्या सोंडेने हलवू लागला. चिमणीने चिव चिव करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आपल्याच मस्तीत जोरजोराने फांदी हलवत होता. अखेरीस व्हायचे तेच झाले. फांदी तुटली आणि चिमणीचे घरटे त्या फांदीबरोबर खाली कोसळले. चिमणीची पिल्ले त्या घरट्यातून जमिनीवर पडली आणि मरण पावली. एवढ्यात चिमणा तेथे आला. झाल्या प्रकाराने चिमणा-चिमणी हादरून गेले होते. ते जोरजोरात रडत होते. हत्ती अजूनही धुमाकूळ घालत होता. बाजूच्या झाडावरील सुतारपक्ष्याने हे दृश्य पाहिले. तो चिमणीकडे गेला. त्याने चिमणीला धीर दिला. परत घरटे बांधण्याचा सल्ला दिला. सुतारपक्षी उडत उडत हत्तीपाशी गेला. त्याने आपल्या चोचीने हत्तीच्या कपाळावर प्रहार करताच हत्ती भानावर आला. त्याने हत्तीला झालेला प्रकार सांगितला. हत्तीला आपली चूक समजली. तो सातत्याने चिमणा-चिमणीची माफी मागू लागला. सुतारपक्ष्याने हत्तीला समजावले, आपल्या आनंदासाठी इतरांना दु:ख देणे योग्य नाही. हत्तीला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. तात्पर्य: एखादी गोष्ट करण्यापूर्वी विचार करा, नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. |