इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान सहा उपाय सुचवा.
Solution 1
इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात:
- किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.
- वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत.
- ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात.त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
- प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे.ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा.
- या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
- ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
- या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.
- या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
- ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत.
Solution 2
इतिहास जिवंत ठेवण्यासाठी इतिहासाच्या साधनांचे जतन होणे आवश्यक आहे. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी पुढील उपाय सुचवता येतील.
१. ऐतिहासिक स्थळांना पर्यटक म्हणून भेट देता येईल; मात्र या भेटीमध्ये इतिहासाची जाणीव असणे व माहिती मिळवण्याचा उद्देश असणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्या ठिकाणचा, तेथील विशिष्ट वास्तूचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
२. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या कलाकृती व परंपरांविषयक प्रत्येकाला आत्मीयता असते. त्यामुळे, या आत्मीयतेनेच ऐतिहासिक वास्तू कोणत्याही प्रकारे खराब होऊ नये, याची काळजी घेता येईल.
३. यासाठी ज्या ऐतिहासिक वास्तू आपण पाहण्यासाठी जातो, तेथे तेथील व्यवस्थापनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरेल.
४. इतिहासाच्या साधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित नसावा. म्हणजे, प्रत्येक गोष्टीचा इतिहास जतन करता येईल.
५. काही मौखिक साधने जसे - कथा, पोवाडे, ओवी यांचा संग्रह करता येईल.
६. काही लिखित साधनांचे पुनर्मुद्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करता येईल.
७. तसेच, काही छायाचित्रणे किंवा ध्वनी आणि चित्रफितींचे नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवस्थापन करता येईल.
८. ज्या भाषांमध्ये ऐतिहासिक कागदपत्रे किंवा दस्तऐवज आहे, त्यांपैकी काही भाषा आज विद्यापीठीयस्तर किंवा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांद्वारे शिकवल्या जातात, जर इतिहासाच्या लिखित साधनांच्या साहाय्याने संबंधित इतिहास माहीत करून घ्यायचा असल्यास या भाषा शिकता येतील, म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात घेता वर्तमान व भविष्याच्या दृष्टीने ही इतिहासाची साधने जपण्याचा अधिक प्रयत्नही करता येईल.
९. वैयक्तिक स्तरावरही इतिहासाच्या साधनांचा संग्रह करून त्याचे जतन करता येईल, तसेच काही स्वयंसेवी संस्थांकडून ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न केला जातो. अशा संस्था चळवळींमध्ये सहभागी होऊन साधन जतन करण्यात हातभार लावता येईल. जसे - दुर्गांचे किंवा काही नैसर्गिक वारशांचे संवर्धन होण्यासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांमध्ये सहभाग घेता येईल.
१०. याव्यतिरिक्त, ऐतिहासिक साधनांच्या जतनासंदर्भातील चळवळींमध्ये सहभागी होऊन व्याख्याने, चर्चासत्रे, पथनाट्य यांच्या माध्यमातून लोकांमध्ये ऐतिहासिक ठेव्यांबाबत जागृती करता येईल.