दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
Solution
अन्नदाता शेतकरी मी
आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८०% लोकांचा उदरनिर्वाह शेती वर अवलंबून आहे. नमस्कार मंडळी. मी ह्या काळया आईचा लेक बोलतोय... मला वाटलं आज थोडं बोलावं तुमच्याशी. माझी आई म्हणजे माझी काळी माती. तिच्याशी आमचं अनेक पिढ्यांचं नातं. तिच्याच कुशीत जन्मलो, तिच्याच अंगाखांद्यांवर वाढलो, घाम गाळायला शिकलो, तिची सेवा केली आणि मग तिने भरभरून त्याचे फळ दिले. काळया आईची सेवा म्हणजे समस्त मानवजातीची सेवा, म्हणूनच तर मला अन्नदाता, उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते. पण, याचा काय फायदा? आमची दुखरी बाजूही तुम्हांला कळायला हवी. देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो.
कधी कोरडा दुष्काळ तर कधी भयंकर वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातो. आमची सगळी भिस्त पावसावर. पावसाचा लहरीपणा आमच्या साऱ्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी करतो. पाऊस जास्त झाला, कमी झाला किंवा अवेळी झाला तरी प्रत्येकवेळी नुकसान आमचेच. तोंडाशी आलेला घास कधी कधी पावसामुळे हिसकावला जातो. घरात धनधान्य आले, की आपण काय काय करायचे ही स्वप्न आमची पोरंबाळं या बांधांवर बसून पाहतात. फार मोठी नसतात ओ ती स्वप्नं. पण उभं पीक जेव्हा समोर नष्ट होताना दिसतं, तेव्हा ही स्वप्नं अश्रूंमध्ये वाहताना दिसतात. ती स्वप्नं तरी आम्हांला पूर्ण करता यावीत एवढीच काय ती आमची अपेक्षा!
शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली पाहिजे अशी सगळयांची ओरड आहे. होय, बरोबरच आहे. मलाही ते मान्य आहे; पण आम्हांला योग्य ते साहित्य, मार्गदर्शन नको का मिळायला? नवे तंत्र, नवे शोध तेव्हाच लागतील जेव्हा शेतीविषयक अभ्यासक्रम शाळांमधून शिकवले जातील. डॉक्टर, इंजिनिअरप्रमाणे विद्यार्थी 'मी आधुनिक शेतकरी बनणार' असे स्वप्न पाहतील.
नव्या संशोधनातून, वेगवेगळया साहित्यांच्या आधारे वातावरणातील बदल, ऋतूंमधील बदल, मातीचे परीक्षण, तिचे बदलते स्वरूप या साऱ्यांचा अभ्यास केला जाईल. यांवरच आमची आशा मातीशी नाते राखणारा आणि आपल्या मेहनतीने आभाळालाही गवसणी घालणारा शेतकरी लवकरच तुमच्या पिढीत अवतरेल अशी आशा आहे.
हमी भाव मिळत नसल्याने पिकलेला माल कवडीमोल किमतीला विकावा लागतो. कधी कधी असाच फेकूनही द्यावा लागतो. शेती करणे हे अजिबात सोपे काम नाही. अडते, दलाल आपल्या फायद्यासाठी आमचा उपयोग करून घेतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात आमच्या मागण्यांसाठी आम्हाला बंद, संप करावे लागतात. यासारखे दुर्दैव ते काय.
आर्थिक संकटात सापडलेल्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांसारखी वाईट अवस्था इतर कोणाचीही नसेल. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य त्या योजना राबवून पाठबळ दिले, तर आम्ही शेतकरी म्हणून ताठ मानेने जगू शकू.
एक गोष्ट मात्र नक्की, शेतकरी आहे म्हणून शेत आहे आणि शेत आहे म्हणून अन्न आहे आणि अन्न आहे म्हणून आपण जिवंत आहे, हे सर्व जग जिवंत आहे.