दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
Solution
मी शाळा बोलतेय...
एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. कंटाळा आला या एकटेपणाचा. काय ही भयाण शांतता. या कोरोनाने तर साऱ्यांनीच पाचावर धारण बसवली आहे. साऱ्यांचेच जीवन धोकादायक झाले आहे. आश्चर्याने काय पाहताय? अरे बाळांनो, मी तुमची लाडकी शाळा बोलतेय... जवळपास एक वर्ष झालं मी बंद आहे. ना घंटेची ठणठण ना तुमचा गोंधळ. सारं कसं उदास. तुम्ही मला विसरणार तर नाही ना? ऑनलाईन शाळेच्या दुनियेत तुमची खरीखुरी शाळा हरवून तर नाही ना जाणार? याची भीती वाटायला लागली मला. मोबाइलवरची कसली रे शाळा. सारं काही आभासी. मी होते, आहे आणि पुढेही असणारच. पोरांनो; पण तुमची मी मनापासून वाट पाहतेय रे! शाळा म्हणजे समाज मंदिर नाही का? समाजातील विविध जातींच्या, धर्मांच्या, गरीब, श्रीमंत साऱ्या विद्यार्थ्यांना मी आपल्यात सामावून घेते. माझ्यासाठी कोणीही हुशार नाही की 'ढ' नाही. मी सगळयांनाच सारखे ज्ञान देते. उगीच का कवी मला 'ज्ञानमंदिर' म्हणतात. समाजात वावरताना तुम्हांला 'माणूस' म्हणून जगण्याचे बाळकडू मीच पाजते.
शाळा मुलांना म्हणाली, खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. या देशाचे भविष्य असलेले विद्यार्थी, मोठमोठे उद्योगपती, नेते, डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, शास्त्रज्ञ, कलाकार, शेतीतज्ज्ञ सारे माझ्याच सावलीत वाढतात. तुमचे नेतृत्वगुण, तुमची धडपडी वृत्ती, वक्तृत्वशैली साऱ्याची सुरुवात माझ्यापासूनच होते. समाजजीवनातील माझे स्थान अढळ आहे, ते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमुळेच. तुम्हांला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीही तुम्ही मला कधी विसरत नाहीत. 'ही आवडते मज मनापासूनी शाळा' हे तुमच्या मनाचे भाव ऐकल्यावर धन्यधन्य झाल्यासारखे वाटते.
शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. माझा जीव, की प्राण म्हणजे तुम्ही विद्यार्थी. तुमचा आवाज म्हणजे माझा श्वास. तुमच्याविना सुट्टीचे दिवस कसेतरी कंठणारी ही शाळा आज कोरोनामुळे वर्षभराहून अधिक काळ बंद आहे. माझ्या मन:स्थितीची तुम्हांला कल्पनाही करता येणार नाही. माझा तर जीव् गुदमरतोय अगदी. तुम्हांला जिंकताना, लढताना, आनंदी होताना बघण्याची इच्छा आहे. तुमच्या खोड्या, परीक्षेचं दडपण सारं पुन्हा अनुभवायचं आहे. कित्येक दिवसांत प्रार्थना नाही, की राष्ट्रगीत नाही. शिक्षकांचं रागावून ओरडणं, प्रेमाने समजावणं, कौतुकाची थाप सारं काही बंद आहे. या साऱ्यांसाठी मी आतुरतेने वाट पाहत आहे.
माझी लाडकी पिल्लं नुसती माझ्या कुशीत येत नाहीत तर. माझ्यासाठी माझे विद्यार्थी हेच माझे जीवन आहेत. मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी आईचा हात धरून पहिल्यांदा तुम्ही शाळेत येता. रडत रडत येताना तुम्हांला मी पाहते आणि मी मात्र मनात हसत असते; कारण मला माहीत असतं की आता रडणारे तुम्ही मला सोडून जातानाही रडणार आहात. येथे अनेक विद्यार्थी आले, शिकले, मोठे झाले. आपल्याबरोबरच त्यांनी माझे नाव मोठे केले. तुम्हा साऱ्यांचाच मला सार्थ अभिमान आहे. बाळांनो, लवकरच या. पुन्हा नव्या दमाने, भविष्य घडवण्यासाठी मी तयार आहे.